मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घराघऱांत साफसफाई सोबतच फराळाची लगबग सुरू आहे. घरातील साफसफाई करण्यासाठी गृहिणीचा ऑनलाइन सेवांची मदत घेण्याकडे कल वाढला आहे. संपूर्ण घराच्या साफसफाई करण्यासाठी गरजेनुसार तासाभरापासून दोन ते तीन तासांसाठी मदतनीस मागवण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने या सेवांना पसंती मिळत आहे.

गेल्या आठवड्यांपासून ऑनलाइन ॲपवरील मदतनीसच्या मागणीत साधारण ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूर्वी सणासुदीच्या साफसफाईसाठी ओळखीच्या व्यक्तीकडून मदतनीस शोधणे किंवा नेहमीच्या घरकाम करणाऱ्या महिलांकडून अतिरिक्त काम करून घेतले जायचे. मात्र आता मोबाइलवरून ठरावीक वेळेसाठी मदत घेता येत आहे. फरशी पुसणे, धूळ स्वच्छ करणे, भांडी घासणे यासोबतच स्वयंपाकघर, बाथरूम किंवा घराच्या विशिष्ट भागाच्या स्वच्छतेसाठीही मदत निवडता येते.

त्यामुळे धावपळीत वेळ वाचवण्यासाठी अनेक कुटुंबे या सुविधेचा आधार घेत आहेत. ऑनलाइन सेवांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांनाही अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. नियमित घरकामाबरोबरच सणासुदीच्या काळात साफसफाईच्या कामांमधून महिलांना अधिक कमाई करता येते. काही तासांसाठी मिळणाऱ्या कामामुळे उत्पन्नात भर पडत आहे.

नोकरदार महिलांना फायदा

ऑनलाइन सेवा महिलांसाठीही सोयीची ठरत आहे. दिवाळीच्या आधी कार्यालयीन कामे, घऱातील साफसफाई,खरेदी आणि फराळाची तयारी यामुळे महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. वेळेच नियोजन करावे लागते. अशा वेळी संपूर्ण घरासाठी मदतनीस बोलावण्याऐवजी स्वयंपाकघर किंवा हॉलच्या स्वच्छतेसाठी काही तासांची मदत घेणे फायदेशीर होत आहे.

तासाभरासाठी शंभर रुपये

ऑनलाइन घरकाम सेवांचे दर कामाच्या स्वरूपानुसार ठरतात. तासाभराच्या नियमित घरकामासाठी साधारण १०० ते २५० रुपये, तर दोन तासांच्या कामासाठी २०० ते ४०० रुपये खर्च येतो. झाडलोट, फरशी पुसणे, धूळ स्वच्छ करणे आणि भांडी घासणे यांसारखी कामे ठरवलेल्या वेळेत करून घेता येतात. खिशाला परवडत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंब ऑनलाइन घरकाम मदतनीसला पसंती देत आहेत.

प्रतिक्रिया

गेले आठवड्यापासून दिवाळी निमित्ताने नेहमीच्या कामांबरोबर घर,छोट्या कार्यालयांची साफसफाई करण्यासाठी मागणी वाढली आहे. यामुळे नियमित कमाई व्यतिरिक्त साधारण दोन ते तीन हजार रुपये अतिरिक्त मिळत आहेत. त्यामुळे घरखर्चाला हातभार लागतो. – मंदा माने, घरकाम करणारी महिला.

भांडी घासणे, साफसफाई यासाठी दिवसातून दोन-तीन फोन यायचे. मात्र दिवाळीमुळे गेल्या आठवड्यापासून दिवसातून सहा-सात फोन येतात. तास-दोन तासासाठी बोलावले जाते. त्यामुळे कमाई वाढली आहे. – सविता कांबळे, घरकाम करणारी महिला

घरातील ऑफिसची कामे, खरेदी आणि दिवाळीची तयारी यामुळे खूप ओढाताण होते. अशा वेळी आपल्या सोयीनुसार वेळ आणि काम निवडून मदत मागवता येते. त्यामुळे साफसफाईचे नियोजन सोपे झाले आणि उरलेला वेळ इतर तयारीसाठी देता आला. – गितांजली कोळी,गृहिणी.

मला माझे स्वयंपाकघर स्वच्छ करायचे होते. पण वयामुळे जास्त काम होत नाही. माझ्या मुलीने ऑनलाइनद्वारे कामासाठी एक मुलगी पाठवली. त्या मुलीने दुपारी येऊन दोन तासात स्वयंपाक घर स्वच्छ केले आणि मला भांडी घासायला देखील मदत केली. २ तासांचे ४०० रुपये दिले. – मंदाकिनी जाधव,गृहिणी