मुंबई : गगनाला भिडलेले विमानाचे तिकिट, वाढलेला इंधन खर्च आणि रुपयांचे अवमूल्यन यामुळे हवाई प्रवासी संख्येत घट झाली आहे. घटलेल्या प्रवासी संख्येमुळे भारतीय विमान कंपन्यांच्या देशांतर्गत विमान सेवेत गेल्या वर्षीच्या तुलनेत (दिवाळी) यंदा २.६ टक्यांनी घट झाली आहे. एअर इंडियाने सर्वात मोठी कपात करत साप्ताहिक ५४३, तर इंडिगोने ३७५ उड्डाणे कमी केली आहेत. हैदराबाद – तिरुपती, दिल्ली – हैदराबाद, दिल्ली – लेह यांसारख्या मार्गांवरील विमान फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे देशांतर्गत हवाई मार्गावर २२ हजार ३०६ साप्ताहिक उड्डाणे होणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या घटली असून प्रवाशांची संख्या कमी झाल्याने भारतीय विमान कंपन्यांनी विमानांची संख्या कमी केली आहे. विमान कंपन्यांनी ऑक्टोबर २०२५ मधील २२ हजार ९१२ उड्डाणांच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात २२ हजार ३०६ साप्ताहिक उड्डाणे नियोजित केली आहेत. म्हणजेच आठवड्याला ६०६ उड्डाणे कमी केली आहेत. इंधनाच्या वाढलेल्या किंमती आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे विमान प्रवास महाग झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये कपात झाली आहे. मागणीनुसार विमान कंपन्या वेळापत्रकात बदल करुन उड्डाणे करीत आहेत.

एअर इंडियाने विमानांच्या संख्येत सर्वात मोठी कपात केली असून, गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील ३ हजार ६४४ साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणांमध्ये ५४३ (१४.९ टक्के) कपात करून या नोव्हेंबरमध्ये ३ हजार १०१ वर आणली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसने ७८ उड्डाणे, म्हणजेच ३.१ टक्क्यांनी कमी करून, उड्डाणांची संख्या २ हजार ४२० केली. स्पाईस जेटने साप्ताहिक वेळापत्रकात ३७ उड्डाणे, म्हणजेच ५.२ टक्क्यांनी कपात करून ६७९ केली आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने आपल्या साप्ताहिक उड्डाणांमध्ये ३७५ ने, म्हणजेच २.७ टक्क्यांनी कपात करून ती १३ हजार ६९७ केली आहेत.

या देशांतर्गत मार्गावर सर्वाधिक घट

हैदराबाद – तिरुपती आणि दिल्ली – हैदराबाद या मार्गांवर सर्वाधिक प्रत्येकी ८६ साप्ताहिक उड्डाणे कमी केली आहेत. दिल्ली – लेह मार्गावर ७८ विमानांची कपात झाली आहे. त्यापाठोपाठ चेन्नई – मदुराई (७०), अहमदाबाद – गोवा (६८), हैदराबाद – चेन्नई (५८), दिल्ली – चेन्नई(५८), बंगळूर – गोवा (४८), हैदराबाद – पाटणा (४८) आणि जम्मू – श्रीनगर (४७) यांचा क्रमांक लागतो.

छठ पूजा तरी पाटणा, दरभंगा विमानांची संख्या कमी

– दिवाळीनंतर छठ पूजा हा आणखी एक प्रमुख सण असून, मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी जातात. तरीदेखील पाटणा, दरभंगा विमानांची संख्या कमी आहे. पाटणा विमानतळावरून या नोव्हेंबरमध्ये आठवड्याला ३०२ विमानांची उड्डाणे होणार आहेत.

– गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील ३७७ उड्डाणांच्या तुलनेत ७५ उड्डाणांनी, म्हणजेच जवळपास २० टक्क्यांनी कमी आहे. दरभंगा येथून होणाऱ्या साप्ताहिक उड्डाणांची संख्या ६७ वरून ५५ पर्यंत घटली आहे. म्हणजेच १२ उड्डाणांची किंवा जवळपास १८टक्क्यांची घट झाली आहे. – तिकिटांवरील परतावा वाढूनही इंडिगोच्या प्रवासी जागांची संख्या कमी झाली आहे. इंडिगोने जुलै – सप्टेंबर तिमाहीत ८०.३ टक्के प्रवासी लोड फॅक्टर नोंदवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधील लोड फॅक्टर ८२.५ टक्के होता.