फराळालाही महागाईची लागण!

खाद्यतेल, तुपासह बेसन, रव्याच्या किमतीत वाढ

खाद्यतेल, तुपासह बेसन, रव्याच्या किमतीत वाढ; तयार फराळाचे दरही वाढण्याची चिन्हे

मुंबई/ठाणे : करोनाच्या सावटाखाली येत असलेल्या दिवाळसणात फटाके, आप्तेष्टांच्या भेटीगाठी या गोष्टींना मुरड घालावी लागणार असली तरी खुसखुशीत फराळाच्या चवीद्वारे सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या या अपेक्षेवर महागाईमुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांसह खाद्यतेल, तूप, डालडा यांच्या किमतीतही वाढ झाल्याने यंदाचा फराळ महागण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या तोंडावर फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या किमतीत हमखास वाढ होते. यंदा करोनामुळे एकूणच बाजारात मंदीचे वातावरण असल्याने या जिन्नसांच्या दरांत फारशी वाढ न होण्याची शक्यता होती.  मात्र, गेल्या वर्षीपेक्षा खाद्यतेल, तूप आणि डालडा यांच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रति किलो ४६० रुपयाला मिळणारे तूप आता ५०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. ११० रुपये प्रति लिटर मिळणारे खाद्यतेल १३० रुपयांवर गेले आहे. त्याचबरोबर डालडाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. जाड तसेच पातळ पोह्य़ांच्या किमतीत ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. बेसनच्या दरातही किलोमागे १५ रुपयांची वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ८१ रुपये किलोने विकले जाणारे बेसन ९६ रुपयांनी विकले जात आहे.

फराळ उत्पादकही चिंतेत

जिन्नसांच्या महागाईमुळे फराळ बनवून त्याची विक्री करणाऱ्या उद्योजकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. महागाईमुळे फराळाच्या दरांत वाढ करण्यावाचून पर्याय नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. मात्र, दर वाढवल्यास ग्राहकांची मागणी घटण्याची भीती आहे. त्यामुळे काही उत्पादकांनी किमती न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे एकंदर परिस्थिती पाहता भाववाढ करणार नसल्याचे दादर येथील ‘समाधान लाडू केंद्रा’चे संकेत झारापकर यांनी सांगितले. यंदा ग्राहक घरीच फराळ करण्यास प्राधान्य देत आहेत. फराळाच्या किमती वाढवल्यास ग्राहक  खरेदी करणार नाही, असे फराळविक्रेत्या जाई ठाणेकर यांनी सांगितले.

दिवाळीच्या कालावधीत फराळ बनविण्यासाठी या जिन्नसांना मोठी मागणी असते. त्यामुळे यांच्या दरांत दरवर्षी वाढ होत असते. यंदा झालेल्या दरवाढीचा परिणाम विक्रीवरही होण्याची शक्यता आहे. 

– किशोर भानुशाली, किरकोळ विक्रेते, ठाणे 

जिन्नसांचे दर

                  गेल्या वर्षीचे           सध्याचे

तूप                  ४६०                   ५००

साखर               ४०                    ४२

चणाडाळ          ८८                     ९०

रवा                  ३६                     ३६

मैदा                 ३८                     ३८

गूळ                 ८०                      ८०

पातळ पोहे       ५५                      ६०

खोबरे              १६०                     २००

खाद्यतेल       ११०                     १३०

डालडा               १२०                   १४०

(दर रुपये प्रतिकिलो)(मुंबईतील विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दर)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali faral expensive for consumers in this year

ताज्या बातम्या