मुंबई : दीपोत्सवाच्या पर्वात मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला सोने खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनेही खरेदीलाही चालना मिळाली. घसरलेले दर आणि चांगल्या पाऊसपाण्यासह सर्व क्षेत्रांमध्ये करोना प्रतिबंधक शिथिल झाल्यामुळे यंदा मागणी करोनापूर्व स्तर गाठताना दिसेल, अशी सराफ उद्योगात आशा आहे. अपेक्षेप्रमाणे मंगळवारी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह दुणावलेला दिसून आला. मुंबईच्या सराफ बाजारात सोन्याचे दर मंगळवारी ४७,७४० रुपये प्रति तोळा होते. सोमवारच्या तुलनेत त्यात ११० रुपयांची घसरण झाली. तर गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचे दर प्रति तोळा ५०,७०० रुपये होते. त्या तुलनेत यंदा त्यात जवळपास ३,००० रुपयांची (सुमारे सहा टक्क्यांची) घसरण झाली आहे. या दर  फरकाच्या परिणामी धनत्रयोदशीच्या दिवशी अंदाजे १००-१५० टन सोने विकले जाण्याची अपेक्षा आहे. सोन्याच्या तुलनेत चांदी भाव खाताना दिसून, सराफ बाजारात किलोमागे ६४,००० ते ६५,००० च्या घरात तिच्या किमती गेल्या आहेत.

सर्वाधिक मागणी…

सराफ बाजरात दागिन्यांव्यतिरिक्त सोन्याची वळी, नाणी, लक्ष्मी, सरस्वती, गणेशाच्या चांदीच्या शिक्क्यांना मोठी मागणी होती. मुहूर्ताला खरेदीचा कल ओळखून सराफ बाजारात सोन्याचा तुकडा, महालक्ष्मीचे सोन्याचे शिक्के, विविध डिझाइनचे दागिने तयार करण्यावर सराफांचा भर दिसून आला.