मुंबई : दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात आनंदाने फटाके फाेडतात. मात्र, उत्साहाच्या भरात अनेकदा फटाक्यांमुळे उद््भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतींमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
डोळे हा मानवी शरीरातील अत्यंत नाजूक अवयवांपैकी एक आहे. फटाक्यांची अगदी छोटी ठिणगी किंवा कणदेखील डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे, तर आसपास उभ्या असलेल्या व्यक्तींनाही डोळ्यांच्या दुखापतींचा धोका असतो. दिवाळीत डोळ्यांना होणाऱ्या दुखापतींमध्ये कॉर्नियावर ओरखडे पडतात. फटाक्यांचे लहान कण, राख किंवा ठिणग्या डोळ्यांच्या पारदर्शक बाह्य पटलावर (कॉर्निया) परिणाम करू शकतात.
त्यामुळे वेदना, लालसरपणा, डोळ्यांतून पाणी येणे आणि प्रकाश सहन न होणे अशी लक्षणे दिसू शकतात. तसेच फटाक्यांच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र दाबाने डोळ्याच्या आतील संरचनेला गंभीर इजा होऊन डोळ्याचा गोळा फुटू शकतो. गरम ठिणग्या किंवा ज्वाळांमुळे पापण्या, पापण्यांचे केस आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला इजा होऊ शकते. उष्णता किंवा रासायनिक पदार्थांमुळे डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ पडद्याला (कंजंक्टिव्हा) इजा होऊ शकते.
धूळ, राख, फटाक्यांचे अवशेष किंवा स्फोटातून उडणारे कण डोळ्यांत गेल्यास जळजळ आणि इतर गंभीर नुकसान होऊ शकते. फटाक्यांच्या स्फोटामुळे डोळ्यांतील नाजूक रक्तवाहिन्यांना इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. फटाक्यांच्या तीव्र स्फोटामुळे डोळ्यांच्या रेटिनाचेर नुकसान होऊ शकते. यामुळे दृष्टी धूसर होणे किंवा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचा धोका असतो. जास्त रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांमधील पदार्थ डोळ्यांत गेल्यास जळजळ किंवा भाजू शकते.
ही काळजी घ्यावी
फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडावेत. योग्य संरक्षणात्मक साधने वापरावीत आणि फटाके हाताळल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. फटाके पेटवताना हाताच्या अंतराएवढे सुरक्षित अंतर राखावे आणि फटाके पाहताना किमान पाच मीटर अंतर ठेवावे. फटाके चेहऱ्याजवळ धरू नयेत किंवा त्यांच्यावर वाकून पाहू नये. फटाके फोडण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवाव्यात. सिंथेटिक कपडे घालणे टाळावे आणि फटाके फोडताना योग्य पादत्राणे वापरावीत. वापरलेले फटाके फेकून देण्यापूर्वी पाण्याच्या बादलीत भिजवून पूर्णपणे निष्क्रिय करावेत. फटाके चेहरा, केस आणि कपड्यांपासून दूर ठेवावेत.
अपघाताने आग लागल्यास अग्निशमनासाठी पाणी आणि वाळूची बादली जवळ ठेवावी. फटाके बंद पेटीत आणि मुलांपासून दूर, सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. न फुटलेला फटाका हाताळण्याचा प्रयत्न करू नये, तो अचानक पेटू शकतो. त्याच्या जवळ लगेच जाऊ नये किंवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. फटाके हाताळल्यानंतर डोळे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवावेत. फटाके फोडणाऱ्या मुलांवर प्रौढांनी देखरेख ठेवावी.
डोळ्यांना दुखापत झाल्यास काय करावे ?
धूर, धूळ किंवा राखेमुळे डोळ्यांना जळजळ होत असल्यास डोळे चोळू नका. त्यामुळे जळजळ वाढू शकते आणि डोळ्यांना अधिक इजा होऊ शकते. डोळे किमान २० मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवा. जळजळ कमी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. हात स्वच्छ धुतल्याशिवाय डोळ्यांना स्पर्श करू नका. डोळ्यांत गेलेले कण किंवा बाह्य वस्तू स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मलम, आय ड्रॉप्स किंवा घरगुती उपाय करू नका. डोळ्यांत काही तरी गेल्याची किंवा डोळ्याला छेद झाल्याची शंका असल्यास डोळे धुवू नका किंवा त्यावर दाब देऊ नका. डोळ्यावर कोणताही दाब न देता कठीण संरक्षक कवच ठेवून तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.
नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी
फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास, दुखापत किरकोळ वाटत असली किंवा दृष्टी सामान्य असली तरी वैद्यकीय मदत घेण्यास विलंब करू नये. फटाक्यांच्या अपघातानंतर वेदना, लालसरपणा, धूसर दिसणे, प्रकाश सहन न होणे किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
