मुंबई : देशात गतवर्षी सुमारे ३०७ लाख टन कांदा उत्पादन होऊनही उन्हाळी कांदा खराब होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांवर गेल्यामुळे आणि मोसमी पावसाने ओढ दिल्याने कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यातच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटकातील कांद्याची आवक अद्याप सुरू न झाल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीस खरीप कांद्याची आवक सुरू होईपर्यंत कांदा दरात तेजी राहील. थोडक्यात यंदा दिवाळीत कांदा ग्राहकांना चांगलाच रडविणार आहे.
गतवर्षी देशात सरासरी ३०७ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. एकूण कांदा उत्पादनात रब्बी, उन्हाळी कांद्याचे प्रमाण ७५ टक्के, पूर्व हंगामी खरीप हंगामातील १० ते १२ टक्के आणि उशिराच्या खरिपातील कांद्याचा १० ते १२ टक्के हिस्सा असतो. उन्हाळी कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे साठवणूक केली जाते. यंदा उन्हाळी कांदा काढणीच्या वेळी अतिवृष्टी, अवकाळी, गारपिटीचा फटका बसल्यामुळे पावसात भिजला. त्यामुळे चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याच्या वजनात घट येण्यासह कांदा सडणे, कोंब येण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी साठवलेल्या कांद्यापैकी ३० ते ३५ टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे.
दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटकातील कांदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बाजारात येतो. महाराष्ट्रातील कांदा अखेरच्या टप्प्यात असताना दक्षिणेकडील कांदा सुमारे दोन महिने देशाची गरज भागवितो. यंदा मोसमी पाऊस उशिराने सक्रीय झाला, शिवाय पर्जन्यवृष्टीत घट झाली आहे. त्यामुळे अद्याप दक्षिणेकडील कांद्याची आवक झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक परिसरात साठवलेल्या कांद्यावर ताण आला आहे.
खरीप हंगामात महाराष्ट्रासह राजस्थानमधील अलवर आणि गुजरातमधील कांदा साधारण ऑक्टोबर अखेरपासून बाजारात येतो. पण, पाऊस एक महिना विलंबाने सक्रीय झाल्यामुळे कांदा लागवडही एक महिना उशिराने झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार आहे, अशी माहिती सिन्नर येथील कांदा उत्पादक अमोल मुळे यांनी दिली.
लहरी हवामानाचा फटका
कांद्याचे सरासरी इतके उत्पादन होऊनही कांद्याचे दर तेजीत आहेत. उदाहरणार्थ २०२४-२५ मध्ये कांदा उत्पादन ३०७.६ लाख टन होते तर २०२५-२६ मध्ये ३०७.३ लाख टन आहे. दुसरीकडे निर्यातही २०२६-२७ मध्ये ५.३० लाख टन आणि २०२५-२६ मध्ये ६.१० लाख टन होती. तरिही हवामानाच्या लहरीपणाचा फटका कांदा उत्पादनाला बसला आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान करू नका
गत चार वर्षे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही. आता चांगल्या कांद्याला ४० ते ४५ रुपये किलो दर मिळतो आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. केंद्र सरकारने आता ग्राहकांसाठी निर्यात बंदी, साठा मर्यादा लागू करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी आतिश बोराडे यांनी केली आहे.
