लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दरवर्षी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) ही सत्र परीक्षेच्या दरम्यानच घेण्यात येते. मात्र यंदा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पॅट परीक्षा ही दिवाळीच्या सुटीनंतर घेण्यात येणार आहे. मात्र दिवाळीच्या सुटीनंतर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळे पॅट परीक्षा नोव्हेंबरऐवजी ऑक्टोबरच्या अखेरीस होणाऱ्या सत्र परीक्षेदरम्यान घेण्यात यावी, अशी मागणी विविध शाळांमधील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यी संघटनांकडून करण्यात येत आहे.

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून पॅट परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा सत्र परीक्षेसोबतच घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षेचा ताण येत नाही. मात्र यंदा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची पॅट-१ चाचणी नोव्हेंबरमध्ये म्हणजे दिवाळीची सुटी संपल्यानंतर घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी होणाऱ्या सत्र परीक्षा आणि सुटीनंतर पॅट परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचा सुटीचा कालावधीही परीक्षेच्या नियोजनात जाणार असल्याने त्यांना सुटीच्या आनंदाऐवजी अभ्यासाच्या तणावाखाली वावरावे लागणार आहे. शिक्षक संघटनांनी याबाबत शिक्षण आयुक्त तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (एससीईआरटी) निवेदने देऊन पॅटच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.

मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त शिक्षण यांचा विचार व्हावा

– दिवाळीच्या सुटीत अनेकजण मूळगावी किंवा अन्यत्र फिरण्यासाठी जातात. मात्र सुटी संपल्यानंतर शाळेत परतताच विद्यार्थ्यांना पॅट परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक मानसिक दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पॅट परीक्षेचे नियोजन करताना विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त शिक्षण यांचा विचार होणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले.

– दिवाळीची सुट्टी संपवून शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेच्या तयारीत गुंतवण्यापेक्षा त्यांना नियमित अध्ययनासाठी सकारात्मक वातावरण मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पॅट परीक्षा ऑक्टोबरअखेर प्रथम सत्र परीक्षेच्या नियोजनात घेऊन नोव्हेंबरमधील परीक्षेचा ताण टाळावा, असे संघटनेच्या मुंबई दक्षिण विभाग संघटक उज्ज्वला पाटील यांनी सांगितले.

ऑक्टोबरअखेर प्रथम सत्र परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दिवाळीची सुटी असते. सुटीनंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागल्यास त्यांच्यावर अनावश्यक मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त शिक्षण लक्षात घेता पॅट ऑक्टोबरअखेरच घेणे अधिक योग्य ठरेल. – अशरफ मेमन, मुख्याध्यापक, एच. एम. फारूक सत्तार ओमरभाई हायस्कूल फॉर बॉईज, जोगेश्वरी

शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेचे नियोजन ऑक्टोबरमध्ये केले जाते. त्यानंतर दिवाळीची सुटी आणि लगेच नोव्हेंबरमध्ये पॅट परीक्षा अशी रचना झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेच्या वातावरणात यावे लागते. प्रथम सत्र परीक्षेच्या कालावधीतच पॅट परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन शाळांचे शैक्षणिक नियोजनही अधिक सुसूत्र होईल.- राजीव मिश्रा, मुख्याध्यापक, डी. एम. हायस्कूल, बोरिवली

दिवाळीची सुट्टी विद्यार्थ्यांसाठी आनंद, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आणि मानसिक विश्रांतीचा काळ असतो. सुट्टी संपल्यानंतर लगेच पॅट परीक्षेची तयारी करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येऊ नये. विद्यार्थीकेंद्री शिक्षणाचा विचार करता पॅट ऑक्टोबरअखेर प्रथम सत्र परीक्षेसोबत घेणे अधिक योग्य आणि व्यवहार्य वाटते. – भारती दुर्गावते, मुख्याध्यापिका, अनुदत्त स्कूल, कांदिवली