मुंबई : राज्यात यंदा दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोकण प्रदेशासह बहुतांश भागांत ऑक्टोबरमध्ये दीर्घकाळ उकाडा कायम होता. मागील काही दिवस राज्यात वादळी पावसाचा प्रभाव असल्याने कमाल तापमानात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, वादळी पावसाचा प्रभाव बुधवारपासून काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी, पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा प्रशांत महासागरातील ”एल निनो” स्थितीमुळे जागतिक हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. भारतातील संपूर्ण मोसमी पावसाच्या हंगामावर ”एल निनो” स्थितीचा प्रभाव राहिला. या स्थितीचा हिवाळ्यावरही प्रभाव राहील, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यातही संपूर्ण देशात सरासरीहून अधिक कमाल तापमान राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत होती. त्यात मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश होता. तसेच

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागात मंगळवारीही पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागात हलक्या सरींची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.

मागील काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मंगळवारी सरासरीहून ३ ते ४ अंश अधिक किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सध्या काही प्रदेशात रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात कोरडे हवामान राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

‘मुरासू’ चक्रीवादळाची स्थिती काय ?

पाच दिवसाच्या अंतराने बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती होऊन तीव्रता वाढल्यानंतर त्याचे रूपांतर ‘अर्णब’ आणि ‘मुरासू’ या दोन चक्रीवादळात झाले होते. दरम्यान, ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून बुधवारी त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच बुधवारी आंध्र प्रदेशातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.