मुंबई : आखाती देशांतील संघर्षादरम्यान गेल्या महिन्यात ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला भारतीय खलाशी दीक्षित सोलंकी याचे पार्थिव भारतात आणण्यात आले आहे. परंतु, हे पार्थिव आपल्या मुलाचेच आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचे आदेश देण्याची मागणी दीक्षित याच्या कुटुंबीयांतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन नौकानयन महासंचालनालला (डीजी शिपिंग) या प्रकरणी माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

दीक्षित याचे पार्थिव परत मिळण्याच्या मागणीसाठी त्याचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली यांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, रविवारी रात्री दीक्षित याचे पार्थिव भारतात आणण्यात आले. परंतु, ते भारतात परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या कंपनीने सोलंकी कुटुंबीयांना आधी तक्रार दाखल करण्यास आणि डीएनए चाचणी करून घेण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, क्षेपणास्त्र हल्ल्यात जहाजाला आग लागल्याने दीक्षित याचा जळून मृत्यू झाला. त्यामुळे, त्पाचे पार्थिव म्हणून जळलेल्या हाडांचे चार-पाच तुकडेच भारतात आणण्यात आले आहेत. परिणामी, त्याची ओळख पटवणे अशक्य आहे. 

यामुळे, अंत्यसंस्कारांसाठी पार्थिव याचिकाकर्त्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याची डीएनए चाचणी करणे आवश्यक असल्याची माहिती वकील प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयाला दिली. त्यासाठी या प्रकरणी डीएनए चाचणीचे आदेश देण्याच्या मागणीसाठी अंतरिम अर्ज दाखल करण्यात आल्याचेही तळेकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने नौकानयन महासंचालनालयाच्या उप-महासंचालकांना उपरोक्त आदेश दिले व प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ठेवली.

तत्पूर्वी, जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यापासून या संपूर्ण परिस्थितीची ज्या प्रकारे हाताळणी करण्यात आली आहे, त्यावरून या प्रकरणाबाबत संशय निर्माण झाला आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगितले गेले. त्यावर, अशा प्रकरणांमध्ये सामान्यतः कोणती कार्यपद्धती किंवा प्रक्रिया अवलंबली जाते, याविषयी विचारणा न्यायालयाने केली. तेव्हा, ५ एप्रिल रोजी नौकानयन महासंचालनालयाचे उपसंचालकांनी याचिकाकर्त्याला पाठवलेल्या एका ई-मेलचा संदर्भ तळेकर यांनी दिला. त्यात संबंधित शिपिंग कंपनीला, डीएनए चाचणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे नमूद केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

 प्रकरण काय ?

आखाती देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर ४ मार्च रोजी क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन रुमला आग लागली. त्यात मूळचा दिवचा असलेल्या आणि कांदिवली येथे राहणाऱ्या दीक्षित याचा मृत्यू झाला. या संघर्षात मृत्युमुखी पडलेला दीक्षित हा पहिला भारतीय नागरिक आहे.