दिवाळीबाबत दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये असं म्हणत भाजपाचे नेते आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संताप व्यक्त केला. ज्यानंतर मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झाचा पोस्ट केलेला व्हिडीओ त्यांच्या एक्स पेजवरून डिलिट केला आहे. दिया मिर्झानेही या प्रकरणी संताप व्यक्त करत एक पोस्ट केली आहे. तसंच यावरून विविध प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय? दिया मिर्झाने याबाबत काय म्हटलंय आपण जाणून घेऊ.

नेमकं प्रकरण काय?

पावसाळा संपताच मुंबईच्या वायु प्रदुषणात वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांचा धूर यामुळं हवेचा स्तर आणखी खालावू शकतो. यावर उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. मात्र आता या महापालिकेच्या या कॅम्पेनवरुन वाद रंगला आहे. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेने एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत अवाहन करत आहे. दिवाळीत फटाके फोडून ध्वनीप्रदुषण टाळा, असं दिया मिर्झा हिने व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र महापालिकेने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतला.

दिया मिर्झाने व्हिडीओत काय म्हटलं होतं?

नमस्कार, दिवाळी उत्सव जवळ आला आहे. उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या सगळ्यांसाठी हानीकारक आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की दिवाळी आवाजांनी नाही तर आनंदांनी साजरी करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! हा व्हिडीओ महापालिकेने डिलिट केला असला तरीही एक्स पेजवर तो आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. गिरीश कांबळे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अमित साटम यांची पोस्ट काय?

दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दिया मिर्झाने शिकवू नयेत. दिवाळी आणि आमची परंपरा ही आमच्या संस्कृतीत मुळापर्यंत आहे. आम्हाला कुणीही हे शिकवायला जाऊ नये असं म्हणत अमित साटम यांनी संताप व्यक्त केला. अमित साटम यांनी १ नोव्हेंबरला रात्री १० च्या नंतर ही पोस्ट केली. ज्यानंतर मुंबई महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलिट केला.

व्हिडीओ डिलिट केल्यानंतर दिया मिर्झाने काय म्हटलं आहे?

महापालिकेने व्हिडीओ डिलिट केल्यानंतर दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. कोणतेही पैसे या मोहिमेसाठी घेतलेले नाहीत, भलाईचा जमानाच राहिला नाही असं म्हणत दियाने संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओवरून वाद निर्माण झाल्याने दियाने दिलेली ही प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे.

Dia Mirza Social Media Post
दिया मिर्झाने व्हिडीओ हटवल्यानंतर काय म्हटलं आहे? (फोटो-X)

शिवसेना नेत्या शायना एनसी काय म्हणाल्या आहेत?

दिया मिर्झा यांच्या नावातच ‘दिया’ आहे. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. प्रत्येक नागरिकाला हे माहीत आहे की फटाके उडवल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होतं. मात्र यासाठी कुणी प्रवचन देण्याची गरज नाही असं शायना एनसी म्हणाल्या आहेत.

दुसरीकडे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी मात्र या प्रकरणावरून भाजपावर टीका केली आहे. भाजपाची मानसिकता या सगळ्या प्रकरणावरून दिसल्याचं विविध नेत्यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं आहे.