आयआयटी मुंबईतल्या २२ वर्षीय साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो आहे आणि या घटनेची चर्चा देशभरात रंगली आहे. साहिलच्या आई वडिलांनी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावरच आरोप केले आहेत. दुसरीकडे प्राध्यापक डुल्ला यांचा एक जुना ई मेल व्हायरल झाला आहे. या ई मेलमध्ये त्यांनी कुणाचीही जात समजेल असे प्रश्न कुणीही कुणला विचारू नका यासंदर्भातलं आवाहन केलं आहे आणि विद्यार्थ्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत.
सूर्यनारायण डुल्ला यांनी पाठवलेल्या मेलमध्ये काय उल्लेख आहे?
सूर्यनारायण डुल्ला यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एक ई मेल पाठवला होता. हा ई मेल त्यांनी विद्यार्थी व्यवहार विभागाचे डीन असताना पाठवला होता. एखाद्या विद्यार्थ्याची जात किंवा सामाजिक पार्श्वभूमी समजेल असे प्रश्न कुणीही कुणाला विचारू नका असं आवाहन डुल्ला यांनी या ई मेलमधून विद्यार्थ्यांना आणि सदस्यांना केलं होतं. या ई मेल मध्ये डुल्ला यांनी अशीही सूचना केली होती की, कुठल्याच विद्यार्थ्याने दुसऱ्या सहकाऱ्याला, विद्यार्थ्याला, वर्गमित्राला JEE चा नंबर, GATE मध्ये मिळालेले गुण अशी माहिती विचारु नये. तसंच जात किंवा सामाजिक पार्श्वभूमी याबाबतही मुळीच प्रश्न विचारू नयेत ही विशेष सूचना डुल्ला यांनी केली होती. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
प्राध्यापक डुल्ला यांनी मुलांना पाठवलेला मेल व्हायरल
प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला या मेलमध्ये म्हणाले होते, आयआयटी बॉम्बे या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची जात समजेल किंवा त्याची सामाजिक पार्श्वभूमी समजेल असं प्रश्न विचारणं योग्य नाही. तसं केल्यास मुद्दाम किंवा अजाणतेपणीही पक्षपात झाला की काय अशी भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे जात समजेल असा संदर्भ विचारणं गैर आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. आयआयटी बॉम्बे ही अशी संस्था आहे जिथे सर्वसमावेशक वातावरण आहे. धर्म, जात, सामाजिक किंवा आर्थिक स्थिती हे माहीत न होता सगळे विद्यार्थी एकत्र येऊ शकतात. संविधानातील आरक्षणाचं धोरण हे आपण शब्दशः अंमलात आणलं आहे. या आशायचा उल्लेखही डुल्ला यांनी केला होता. तसंच प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं. सूर्यनारायण डुल्लांवर जातीयवाद केल्याचे आरोप होत आहेत. त्याच दरम्यान हा जुना मेल व्हायरल झाला आहे.
रविंद्र वाकोडे यांनी प्राध्यापक डुल्लांवर का आरोप केला आहे?
प्रोफेसर डुल्ला यांनी साहिलला म्हटलं होतं की मी उच्च जातीचा आहे आणि तू खालच्या जातीचा आहे. मी तुला कुठल्यातरी प्रकरणात अडकवेन. शिरीष केदारेंचा त्यांना वरदहस्त आहे. शिरीष केदारे यांच्या सांगण्यावरूनच माझ्या मुलाचा छळ करण्यात आला आहे. मला एक गोष्ट सांगा सूर्यनारायण डुल्ला हे २००९ पासून आयआयटी बॉम्बे मध्ये काय करत आहेत? दर तीन वर्षांनी प्राध्यापकांची बदली होत असते. सूर्यनारायण डुल्ला यांची बदली कशी काय झाली नाही?
