मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत असलेल्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार उघडकीस येत आहेत. त्याची दखल घेऊन रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगणारे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत.

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मागील काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा असल्याचे कारण देत रुग्णांना औषधे बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगण्यात येत असल्याचे तक्रारी येत आहेत. औषधे बाहेरून खरेदी करावे लागत असल्याने रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी रुग्णालयात येणाऱ्या सर्व रूग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे रुग्णालयातील औषध साठ्यातूनच उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच जी औषधे शासनाच्या मान्य यादीबाहेरील विशेष उपचारासाठी अत्यावश्यक औषधांव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना बाहेरील वैद्यकीय दुकानातून औषधे खरेदी करण्यास सांगू नये, औषधांचा तुटवडा टाळण्यासाठी औेषध साठ्याची नियमित तपासणी करून पुरेसा औषधांचा साठा कायम ठेवावा.

यासाठी पूर्वनियोजन, पुरवणी मागणीचा प्रस्ताव वेळेवर सादर करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच कोणत्याही अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितल्याचे आढळून आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

औषध वितरण प्रणाली पारदर्शक करण्याच्या सूचना

रुग्णालयातील औषध वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम राहण्यासाठी औषध वितरण नोंदी, स्टॉक रजिस्टर व डिजिटल प्रणाली अद्ययावत ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होत की नाही याची पडताळणी करण्यासाठी वेळोवेळी निरीक्षण व अहवाल सादर करण्याची जबाबदारीही वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तातडीने औषधांची खरेदी करावी

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, परिचर्या, व्यवसायोपचार, भौतिकोपचार महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये दैनंदिन जमा होणारे रुग्ण तपासणी शुल्क व विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे शैक्षणिक शुल्क हे संबधित रुग्णालयाच्या स्वीय प्रपंजी खात्यात जमा होते. त्या खात्यातून तातडीच्या प्रसंगी खर्च करण्याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार रुग्णसेवेत तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बाधा निर्माण होऊ नये यासाठी तातडीच्या प्रसंगी खर्च करण्यास वित्त विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक औषधांची खरेदी त्या खात्यातील रकमेतून करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांच्या प्रमुखांना दिल्या आहेत.