पाच वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूविरोधी लसीच्या साइड इफेक्ट्सबाबत शंका काढून ती टोचून घेण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरांकडूनच यावर्षी लस देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून लस घेण्यास इच्छुक असलेल्या राज्यभरातील डॉक्टर, परिचारिकांची संख्या मागवण्यात आली असून तशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. पाच वर्षांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पाठविण्यात आलेल्या ९० टक्के लसी पाठवून देण्याची वेळ ओढवल्याने यावेळी खबरदारी घेण्यात येत आहे.
स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णाला इतरांपासून वेगळे ठेवले जाते. हा आजार हवेतून पसरत असल्याने रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर तसेच परिचारिका- कर्मचारी यांनाही संसर्गाची शक्यता वाढते. २००९ मध्ये स्वाइन फ्लूची साथ पहिल्यांदा आली. स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या सतत सान्निध्यात राहत असलेल्या रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांसाठी केंद्र सरकारकडून स्वाइन फ्लूच्या लस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र स्वाइन फ्लूची लस प्रत्यक्षात घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र अनेक डॉक्टरांनी नकार दर्शवला. त्यामुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही या लसीकडे पाठ फिरविल्याने आरोग्य विभागाला या लसी परत पाठवाव्या लागल्या.
आता दरररोज स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याने डॉक्टरांनीच आता स्वाइन फ्लूच्या लसीची मागणी केली आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद – अशा साथ असलेल्या शहरातील स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून तेथील डॉक्टरांच्या मागणीची नोंद करण्यास सांगितले आहे. यावर्षी केंद्र सरकारकडून डॉक्टर तसेच परिचारिका, कर्मचाऱ्यांसाठी लसीसंदर्भात कोणतीही सूचना आलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर डॉक्टरांकडूनच तशी मागणी होत असल्याने आम्ही नोंदणी करून ती केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अतिजोखमीच्या व्यक्तींसाठीही या लसीची मागणी नोंदवण्याचा विचार सुरू आहे, असे राज्याचे स्वाइन फ्लू विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. मुंबईहून डॉक्टर, कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या लसीची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईतील रुग्णांची संख्या १५१ वर
स्वाइन फ्लू यावेळी लहान मुलांमध्ये दिसत आहे. गेल्या २४ तासात पाच वर्षांखालील १० लहान मुलांसह २७ मुंबईकरांना स्वाइन फ्लूचे निदान झाले असून रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. त्याचवेळी शहराबाहेरून आलेल्या ६ नवीन रुग्णांसह ४४ जणांनाही एचवनएनवन या विषाणूंनी गाठले आहे.
लस देण्यासंदर्भातील त्रुटी
इतर आजारांच्या लसी या आयुष्यभर संरक्षण देत असल्या तरी स्वाइन फ्लूविरोधात उपलब्ध लस ही केवळ आठ ते दहा महिने संरक्षण देते.
एन्फ्लुएन्झाचे विषाणू अनेक प्रकारचे असतात. त्यातील सर्व विषाणूंविरोधातील लस उपलब्ध नाही.
कोणत्या ऋतूत कोणता विषाणू प्रभावी ठरेल ते माहिती नसल्याने लस कितपत उपयोगी ठरेल ते सांगता येत नाही.




२०१० मध्ये फसलेली मोहीम
केंद्र सरकारने राज्यातील डॉक्टर, परिचारिकांच्या संख्येनुसार मार्च २०१० मध्ये ३४,३०० लस पाठवून दिल्या होत्या. मात्र तेव्हा नाकावाटे ड्रॉपने घालण्याच्या लसी बाजारात येत असल्याची कुणकुण लागल्याने डॉक्टरांनी लस टोचून घेण्यास नकार दिला होता. चार महिन्यात केवळ १,९९० लस वापरल्या गेल्या होत्या व उर्वरित लस पडून होत्या.