विनायक डिगे

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा निवडणूक १७ मार्च रोजी होत असून या निवडणुकीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पात्र प्राध्यापकांची यादी नुकतीच विद्यापीठाने जाहीर केली. मात्र या यादीत मुंबईतील जे.जे., केईएम, नायर आणि कूपर या महत्त्वाच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांतील बहुसंख्य प्राध्यापकांची नावेच नाहीत.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवडून द्यावयाच्या सदस्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. अधिष्ठाता किंवा प्राचार्य यांची विद्याशाखानिहाय यादी, प्राध्यापकांची महसूल विभागनिहाय यादी, शिक्षकांची विद्याशाखानिहाय यादी, विभागप्रमुखांची पदवी व पदव्युत्तर एकत्रित अभ्यासमंडळ निहाय यादी विद्यापीठाने ७ फेब्रुवारी रोजी जाहीर केली. मात्र प्राध्यापकांच्या जाहीर अंतिम यादीत ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जे.जे. रुग्णालय) ६० प्राध्यापक आणि २४० शिक्षक, सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातील (केईएम रुग्णालय) १०० प्राध्यापक आणि ३३० शिक्षक, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील (नायर रुग्णालय) ८० प्राध्यापक आणि २०० शिक्षक, आणि एचबीटी वैद्यकीय महाविद्यालयाची (कूपर रुग्णालय) यादी अपूर्ण आहे. मुंबईतील जवळपास ३५० प्राध्यापक आणि ५०० शिक्षकांचा यादीत समावेश नाही. ही बाब महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने (एमएसएमटीए) आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देत प्राध्यापक व शिक्षकांची नावे यादीत समाविष्ट करण्याची विनंती केली. तसेच अंतिम मतदार यादीत नावे नसल्याने राज्यातील विविध जीएमसी व महानगरपालिकांच्या अधिष्ठात्यांनी तक्रार केल्यानंतरही विद्यापीठ मतदार यादीत नावे समाविष्ट न करण्याबाबत ठाम आहे.

विद्यापीठाने १३ फेब्रुवारी रोजी सुधारित यादी जाहीर करून काही रुग्णालयातील सुमारे २०० डॉक्टरांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली. मात्र मुंबईतील डॉक्टरांची नावे समाविष्ट करण्यास नकार दिला. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

जीएमसीच्या प्राध्यापकांना वगळले
राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयातील तीन हजार २०० शिक्षक आहेत. मात्र यातील बहुतांश शिक्षकांना यादीतून वगळण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयाबरोबरच लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) ३० प्राध्यापक, नागपूर जीएमसीमधील ५० प्राध्यापकांना वगळण्यात आले आहे. तर जीएमसी अलिबाग आणि सिंधुदुर्गातील फक्त दोन प्राध्यापकांची नावे यादीत आहेत.

जीएमसी आणि महानगनरपालिकेच्या महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांची नावे निवडणूक मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय एमएसएमटीएने घेतला आहे. – डॉ. सचिन मुलकुटकर, अध्यक्ष, एमएसएमटीए

Story img Loader