मुंबई : डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोपाप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यातर्फे पुन्हा एकदा हव्या त्या अटी घाला, पण तुरुंगातून बाहेर काढण्याची याचना शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने मात्र ६ ऑगस्ट रोजी त्याच्या मागणीवर विचार करू, असे स्पष्ट केले. तर प्रकरणाचा तपास जलदगतीने करून तो दोन आठवड्यांत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन म्हणून म्हात्रे हा पोलिसांना शरण गेला होता. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. त्याला जामीन आधीच मिळालेला आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत तो राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे,

त्यामुळे, न्यायालयाने त्याला हव्या त्या अटींवर आता तरी तुरूंगात बाहेर काढण्याबाबत विचार करावा, अशी मागणी म्हात्रे याच्यावतीने वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाकडे केली. तर, जामीन हा नियम आणि तुरूंग हा अपवाद असला तरी हे प्रकरण डॉक्टरांवरील हल्ल्याचे आहे. याशिवाय, म्हात्रे याच्यावर यापूर्वीही सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांसमोरच एका महापालिका अभियंत्याला त्याने मारहाण केल्याचाही त्याच्यावर आरोप होता. परंतु. त्याची त्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली.

असे असले तरी म्हात्रे याने वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याची तुरुंगातून सुटका करू नये, अशी भूमिका घेऊन भारतीय वैद्यक परिषदेच्या (आयएमए) वतीने वरिष्ठ वकील एस. यु. कामदार यांनी म्हात्रे याची सुटका करण्यास विरोध करताना केला. या प्रकरणी न्यायमित्र म्हणून नियुक्त केलेले वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनीही म्हात्रे याला तपास पूर्ण होईपर्यंत तुरूंगातून सोडण्यात येऊ नये, अशी भूमिका मांडली.

दुसरीकडे, प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्यात आला असून तपास जलदगतीने करण्याचा आणि दोन आठवड्यांत तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय, यापूर्वी नोंदवलेल्या नऊ जणांच्या जबाबांव्यतिरिक्त आणखी १७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून आणखी १० साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याची माहितीही महाधिवक्त्यांनी दिली.

याशिवाय, आरोपींच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे आणि पुढील आठवड्यापर्यंत त्यांची ओळख परेड देखील केली जाईल, असेही साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले. सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्ट रोजी ठेवली आणि त्यावेळी म्हात्रे याच्या तुरूंगातून सुटका करण्याच्या मागणीवर विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.