मुंबई : मध्य रेल्वेवरील डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे चाक घसरल्याने संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली. लोकलचे चाक रेल्वे रूळावर आणण्यासाठी आणि लोकल सेवा सुरू करण्यासाठी तब्बल २.४५ तास लागले. यावेळेत कोपर ते कल्याण लोकल सेवा ठप्प होती. या संपर्ण घटनेप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीतून या घटनेचा उलगडा होईल.

नऊ लोकल सेवा रद्द

सकाळी घडलेल्या संपूर्ण घटनेमुळे एकूण १२ लोकल वळवण्यात आल्या, तर, ९ लोकल रद्द करण्यात आल्या. या मार्गावर क्राॅसओव्हर असल्याने कोणतेही वेगमर्यादा लावली नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी नेमली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेवरील बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे चाक घसरल्याने, लोकल सेवा ठप्प झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. तर, कल्याण वरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कूर्मगतीने धावत होती.

डोंबिवली येथील क्रॉसओव्हरवर वेगमर्यादा ताशी १५ किमी आहे. त्यामुळे या मार्गावर लोकल सेवा धीम्या गतीने जाते. या ठिकाणी अभियांत्रिकी कामे सुरू आहेत. याआधीही याठिकाणी लोकलचे चाक घसरण्याची घटना घडली आहे, अशी माहिती एका मोटरमनने दिली.