मुंबई : ऑगस्ट महिन्यात देशातील एकूण देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक ६.३४ टक्यांनी घटून १२१.२६ लाख (१.२१ कोटी) वर आली आहे. ऑगस्ट महिन्यात ७८.८७ लाख प्रवाशांची वाहतूक करत, इंडिगोने ६५ टक्के हिस्सेदारीसह देशांतर्गत विमानवाहतूक बाजारपेठेत आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीनुसार, भारतातील देशांतर्गत विमान कंपन्यांनी ऑगस्ट २०२६ मध्येसुमारे १.२१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्यातुलनेत प्रवासी संख्या ६.३४ टक्यांनी कमी आहे. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी आहे. इंडिगोने या महिन्यात ७८.८७ लाख प्रवाशांची वाहतूक केली आणि बाजारात ६५ टक्के वाटा मिळवला. तथापि, इंडिगोचा बाजारातील वाटा जुलै महिन्यातील ६७.४ टक्यांवरुन वरून घसरला आहे.

३२.३२ लाख प्रवाशांची वाहतूक करून एअर इंडिया ग्रुप २६.७ टक्के बाजारहिस्सा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै महिन्यातील २४ टक्यांच्या तुलनेत, एअर इंडियाच्या हिश्श्यात २.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. अकासाएअरने ५.५ टक्के वाटा कायम राखत ६.६८ लाख प्रवाशांची वाहतूक केली. स्पाईसजेटने ऑगस्ट महिन्यात १.४० लाख प्रवाशांची वाहतूक करत देशांतर्गत बाजारपेठेत १.२ टक्केवाटा मिळवला.विमान कंपन्यांच्या कामगिरीच्या आकडेवारीतून वेळेवर उड्डाण करण्याच्या बाबतीत एक मोठी तफावत दिसून आली आहे.

स्पाईसजेट विलंबाने

– प्रमुख विमान कंपन्यांमध्ये इंडिगोने सुमारे ९१टक्के वेळेवर उड्डाण करण्याची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, त्यापाठोपाठ अकासा एअर ९०.५ टक्के कामगिरीसह दुसऱ्या क्रमांकावर होती. एअर इंडिया ग्रुपने ८३.९ टक्के कामगिरी नोंदवली, तर अलायन्स एअर ७१.८ टक्के वर होती. स्पाईसजेटची वेळेवर उड्डाण करण्याची कामगिरी १७.९ टक्के होती. – गेल्या वर्षाच्या तुलनेत देशांतर्गत प्रवासी वाहतूक कमी असताना ऑगस्ट महिन्याची आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी-ऑगस्ट २०२६ दरम्यान, भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी ११०.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, तर २०२५ च्या याच कालावधीत हा आकडा ११०.७३ दशलक्ष होता, म्हणजेच ०.१८ टक्यांची किरकोळ घट झाली आहे.