मुंबई : विमान प्रवासाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. तर दुसरीकडे विमानांमधील बिघाडांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एकूण २९ हजार तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी ६० टक्के तक्रारी विमान बिघाडाबाबत होत्या.
देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. देशात एकूण ५५० विमाने प्रवासी सेवेत आहेत. वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी विमान कंपन्यांनी विमान फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. परंतु वाढीव फेऱ्यांमुळे विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे मुंबई-दिल्ली विमान एआय १८५१ मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर सुमारे ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभे होते. दुपारी ३:२५ वाजता विमान उड्डाण करणार होते. परंतु दुपारी ४.१५ नंतर विमानाने उड्डाण केले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
गेल्या काही वर्षांत विमानांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. अनेक वेळा विमान विलंबाने येते. त्यानंतर विमानांची देखभाल-दुरुस्ती वेळेत होत नाही. अनेकदा विमानांमध्ये वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असते. प्रवासी खिडकीजवळील आसन आरक्षित करतात. मात्र खिडकीजवळील आसनच गायब असते. असाच एक प्रकार इंडिगोच्या विमानात घडला.
इंडिगोच्या मुंबई – उदयपुर विमानातील खिडकीजवळील आसन एका महिला प्रवाशाने आरक्षित केले होते. विमानात चढल्यानंतर आसनच जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. आसनाबाबत महिला प्रवाशाने हवाई सुंदरीला विचारले. आसनाचे कुशन ओले झाल्याने बदलण्यासाठी नेले होते. पण नवीन कुशन लावण्याआधीच प्रवासी विमानात दाखल झाले होते.
एकुण तक्रारी-–२९२१२
तक्रारीचे स्वरुप
विमान बिघाड – ६० टक्के
सामानाबाबत – २८.१ टक्के
परतावा – ७.५ टक्के
देशातील विमान कंपन्यांच्या ताफ्यातील विमानांपैकी निम्म्या विमानांमध्ये वारंवार दोष आढळून आले आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यापासून सहा शेड्युल विमान कंपन्यांच्या ७५४ विमानांमध्ये वारंवार उद््भवणाऱ्या समस्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये ३७७ विमानांमध्ये वारंवार दोष आढळून आले. देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोच्या सर्वाधिक विमानांमध्ये वारंवार दोष उद््भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांमध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या आहेत.
