घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून आजपासूनच नवे दर लागू होणार आहेत. तेल कंपन्यांनी १ मार्चपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारकडून ही घोषणा करण्यात आली.

ज्या गॅस सिलेंडरवर अनुदान दिले जाते अशा सिलेंडरच्या दरात सुमारे २.५० रुपयांनी कपात झाली आहे. तर विनाअनुदानीत गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल सुमारे ४७ रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या देशातील चार मोठ्या महानगरांमधील घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात २.५० रुपयांपेक्षा अधिक कपात करण्यात आली आहे. त्यामुळे १४.२ किलोचा गॅस सिलेंडर दिल्लीत ४९३.०९ रुपये, कोलकातामध्ये ४९६.०७ रुपये, मुंबईत ४९०.८ रुपये तर चेन्नईत ४८१.२१ रुपयांना मिळणार आहे. या हिशोबाने दिल्लीत २.५४ रुपये, कोलकातामध्ये २.५३ रुपये, मुंबईत २.५७ रुपये तर चेन्नईत २.५६ रुपयांनी गॅस स्वस्त झाला आहे.

तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर तब्बल ४७ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे दिल्लीत ४७ रुपयांची कपात होऊन गॅस सिलेंडरची किंमत ६८९ रुपये, कोलकातामध्ये ४५.५० रुपयांची कपात होऊन ७११.५० रुपये, मुंबईमध्ये ४७ रुपयांची कपात होऊन ६६१ रुपये तर चेन्नईमध्ये ४६.५० रुपयांची कपात होऊन ६९९.५० रुपये इतकी विनाअनुदानित गॅसची किंमत असणार आहे.