दीड वर्षाहूनही अधिक काळ एका अज्ञात विषाणूच्या भीतीने कोंडलेले जग पुन्हा करोनापूर्व काळातील आयुष्याकडे वळत असतानाच ओमायक्रॉन या नव्या अवतारात करोना जगापुढे उभा ठाकला आहे. राज्यात या उत्परिवर्तनाचे बाधित आढळल्याने सर्वत्र चिंतेची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे साथरोग सर्वेक्षण प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी साधलेला संवाद. 

* ओमायक्रॉन म्हणजे काय आणि कोठून आला?

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

दक्षिण आफ्रिकेतील ग्वान्टेंग भागात करोनाचे उत्परिवर्तित  बी.१.१. ५२९ हे रूप आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याचे नाव ओमायक्रॉन असे ठेवले आहे. करोना विषाणू गेल्या दीड वर्षापासून जगावर राज्य करत आहे. एखादा विषाणू अधिक काळ वातावरणात वावरत असेल तर त्याला प्रतिकार करणारी सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होते.  या शक्तीला अधिक ताकदीने प्रतिरोध करण्यासाठी वातावरणात असलेला विषाणू त्याच्या अंतर्गत रचनेत काही बदल करतो याला उत्परिवर्तन (म्युटेशन) असे म्हटले जाते. आतापर्यंत करोनामध्ये विविध प्रकारची उत्परिवर्तित रूपे आढळली आहेत. त्यांना अल्फा, बीटा, डेल्टा अशी नावे देण्यात आली आहेत.  यामध्ये त्याच्या काटेरी आवरणाच्या प्रथिनांमध्ये एक ते दोन प्रकारचे बदल झालेले आढळले आहेत. नव्याने आढळलेल्या ओमायक्रॉनच्या प्रथिनांमध्ये मात्र ३२ प्रकारचे बदल झालेले आहेत. त्यामुळे हा उत्परिवर्तित विषाणू आतापर्यंतच्या उत्परिवर्तनापेक्षा वेगळा आहे. भारतात उगम झालेल्या डेल्टामध्ये दुहेरी उत्परिवर्तन होते.

*  ओमायक्रॉन हे चिंताजनक उत्परिवर्तन आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमायक्रॉन हा करोनाविरोधात तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीवर मात करू शकतो  आणि वेगाने पसरू शकतो. परंतु याबाबत अजूनही ठोस माहिती अद्याप उपलब्ध नसल्यामुळे अनेक शंका आहेत. प्रामुख्याने या विषाणूच्या प्रसाराचा वेग, रोगप्रतिकार शक्तीवर मात करण्याची तीव्रता, लक्षणांची तीव्रता, मृत्यूचे प्रमाण, लशीची परिणामकता याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. जसजसे पुरावे समोर येतील, तशी याबाबत अधिक स्पष्टता येईल, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णांमध्ये फारशी तीव्र लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे येथे रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. तसेच राज्यात आढळळेल्या आठ रुग्णांपैकी केवळ दोन रुग्णांना सुरुवातीला ताप आला होता, तर अन्य सहा रुग्ण पूर्णपणे लक्षणेविरहित आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत  आढळलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे स्वरूप अगदीच सौम्य आहे. या विषाणूच्या वर्तणुकीबाबत अधिक माहिती येत्या काळात प्राप्त होईल. याबाबतचे शास्त्रीय पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत  अंतिम भाष्य करणे योग्य नाही.

*  ओमायक्रॉन नाव का?

 करोनाच्या विविध उत्परिवर्तनाची वैज्ञानिक नावे सामान्यपणे वापरणे अधिक गुंतागुंतीचे आहे. त्यांचा उल्लेख करणे अधिक सोपे व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने उत्परिवर्तनांची नावे ही ग्रीक अक्षरांवरून ठेवलेली आहेत. आतापर्यंत आढळलेल्या उत्परिवर्तनांची नावे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशी आहेत. आतापर्यंत असे १२ प्रकारचे उत्परिवर्तन आढळले असून १२ ग्रीक अक्षरांवरून ही नावे ठेवलेली आहेत. १२ व्या उत्परिवर्तनाचे नाव म्यू होते. या क्रमानुसार नव्याने आढळलेल्या उत्परिवर्तनाचे नाव न्यू ( ठ४) किंवा क्षी  ( ्र) असे असायला हवे होते. परंतु न्यू हे नवीन या शब्दाशी मिळतेजुळते आहे, तर क्षी हे आडनाव असल्यामुळे ही दोन्ही नावे देणे आरोग्य संघटनेने टाळले असून यापुढील अक्षर ओमायक्रॉनचे नाव या उत्परिवर्तनाला दिले आहे.

* या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे ?

 करोनाच्या विषाणूचा प्रकार बदलला तरी त्याला रोखण्यासाठीचे उपाय मात्र तेच आहेत. गर्दी टाळणे, हात वारंवार धुणे, मुखपट्टीचा योग्य रीतीने वापर करणे या करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास विषाणूचा प्रसार निश्चितच रोखता येईल. घराबाहेर पडल्यावर मुखपट्टीचा वापर योग्य रीतीने करणे हा उत्तम उपाय आहे.

*  ‘एस’ जनुकीय आरटीपीसीआर चाचण्या म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीच्या नमुन्यात आरटीपीसीआर चाचणीमध्ये ‘एस’ हा जनुकीय घटक अस्तित्त्वात नसल्याचे बहुतांश प्रयोगशाळांच्या अहवालात निर्दशनास आले आहे. त्यामुळे हा जनुकीय घटक ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये उपलब्ध नसल्यास शक्यतो ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे, असे सूत्र प्राथमिक पडताळणीसाठी वापरता येईल. परंतु अंतिम निर्णयासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्र्वेंन्सग) चाचण्या करणे आवश्यक आहे, असेही यात स्पष्ट केले आहे.

 करोना विषाणूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये ‘एस’, ‘एन’, ‘ई’ आणि ‘ओआरएफ’ हे जनुकीय घटक असतात. सर्वसाधारणपणे यातील कोणत्याही दोन जनुकीय घटकांचा वापर केलेल्या संचाचा वापर सध्या केल्या जातो. आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या बहुतांश चाचण्या संचामध्ये एस या जनुकीय घटकाचा वापर केलेला नाही. ही चाचणी आरटीपीसीआर चाचणीप्रमाणेच असून यासाठी ‘एस’ जनुकीय घटकाचा वापर केलेल्या संचाचा वापर केला जातो. एस जनुकीय घटक करोना विषाणूच्या काटेरी प्रथिनांशी निगडित आहे. परंतु ही चाचणी १०० टक्के खात्री करणारी नाही. त्यामुळे जिनोम सिक्र्वेंन्सगनंतरच एखाद्या व्यक्तीमध्ये ओमायक्रॉनमुळे बाधा झाली आहे का असे खात्रीने सांगता येईल.

* सध्या वापरल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णाचे निदान होते का?

 एखाद्या रुग्णाला ओमायक्रॉनमुळे करोनाची बाधा झाली असल्यास त्याला करोनाची बाधा झाल्याचे निदान सध्या वापरल्या जाणाऱ्या आरटीपीसीआरमध्ये समजते. त्यामुळे रुग्णांचे निदान या चाचणीमधून निश्चितच होते. परंतु या रुग्णाला ओमायक्रॉन याच नव्या रूपाची लागण झाली आहे का याचे निदान जनुकाय चाचणीद्वारे करता येते.

*  लशीमुळे संरक्षण मिळेल का?

विषाणूची बाधा लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाही होत असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये मुळातच लसीकरण फार कमी झाले आहे. त्यामुळे तेथे पसरत असलेल्या विषाणूवरून लशीच्या परिणामकतेबाबत ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. राज्यात आढळलेल्या आठ रुग्णांपैकी चार रुग्णांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत, तर तीन रुग्ण हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. लशीच्या परिणामकतेबाबत ठोस माहिती उपलब्ध होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल.

* ओमायक्रॉन डेल्टाला संपविण्यासाठी फायदेशीर असेल ?

 निर्सगाच्या नियमानुसार जेव्हा एखादा सूक्ष्मजीव वेगाने पसरतो तेव्हा तो कमी घातक असतो आणि जास्त घातक असलेले जीव कमी वेगाने पसरतात. दक्षिण आफ्रिकेसह काही संशोधकांच्या मते ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी घातक असून वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णांना आजाराची बाधा होत असली तरी याचे स्वरूप सौम्य आहे. त्यामुळे  ओमायक्रॉन हा एखाद्या लशीप्रमाणे काम करेल आणि जगाला साथरोगाच्या स्थितीतून अंतर्जन्य स्थितीकडे नेण्यास मदत करेल. याबाबत शास्त्रीय माहिती उपलब्ध झाल्यावरच ठोसपणे सांगता येईल. तोपर्यंत विषाणूबाबत भीती बाळगू नये, परंतु सावध होणे मात्र गरजेचे आहे.

*  राज्यात काय उपाययोजना केल्या जात आहेत ?

राज्यात ओमायक्रॉनबाधित जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. तसेच अन्य देशातून आलेल्या दोन टक्के प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करत आहोत. जेणेकरून बाधित प्रवाशांचे वेळेत निदान करून विलगीकरण केले जाईल. याव्यतिरिक्त मागील महिनाभरात जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात असून यांच्याही चाचण्या केल्या जात आहेत. तसेच यांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. बाधित आढळलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले जात आहेत. यासाठी राज्यात सध्या सहा जनुकीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

मुलाखत : शैलजा तिवले