कोलाड येथे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त हुकला

गेल्या अनेक वर्षांपासून गावच्या जत्रेला गेल्यानंतर कोकणवासीयांनी ‘द्येवा म्हाराजा’ला घातलेले कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे गाऱ्हाणे अखेर ‘प्रभू’ने ऐकले असून आता ८ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. मात्र, काही कारणास्तव हा मुहूर्त एका आठवडय़ाने पुढे गेला असून आता रविवारी, ८ नोव्हेंबरला कोलाड येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेतील सूत्रांनी दिली.
महिन्याला १२०० प्रवासी गाडय़ा आणि ५०० विशेष गाडय़ा, त्याशिवाय देशाच्या आर्थिक घडीसाठी महत्त्वाच्या अशा मालगाडय़ा; अशी प्रचंड वाहतूक कोकण रेल्वेमार्गावरून होते. कोकणात जाण्यासाठी असलेल्या या मार्गापैकी रोह्य़ापर्यंतच्या मध्य रेल्वेच्या हद्दीतील मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, कोकण रेल्वेच्या हद्दीतील कामाला सुरुवातही झाली नव्हती. हा मार्ग एकेरी असल्याने गाडय़ांच्या वाहतुकीवर अनेक र्निबध येतात आणि वाहतुकीचा खोळंबाही होतो.
या त्रासातून मुक्ती देण्यासाठी कोकण रेल्वेमार्गाचेही दुपदरीकरण व्हावे, ही मागणी प्रवाशांनी वारंवार केली होती. त्यानंतर कोकण रेल्वे महामंडळाने या कामाचा आराखडा आणि प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला होता. या कामासाठी तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून भारतीय जीवनविमा महामंडळाने काही वाटा उचलण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जाते. मात्र या मार्गावरील दुपदरीकरण आणि विद्युतीकरण या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी काहीच तरतूद केली नसल्याचेही समजते. आता रविवारी ८ नोव्हेंबर रोजी कोलाड येथे या दुपदरीकरणाच्या कामाची सुरुवात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेतील सूत्रांनी दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित असतील, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही वर्षांत कोकणातील प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

‘कोरे’वरची वाहतूक..
’महिन्याला १२०० प्रवासी गाडय़ा. ५०० विशेष गाडय़ा
’महत्त्वाच्या मालगाडय़ा
’एकेरी मार्गामुळे गाडय़ांच्या वाहतुकीवर अनेक र्निबध. वाहतुकीचा खोळंबाही