काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी भाजप-राष्ट्रवादी हातमिळवणी?

राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका आल्यानेच नगरमध्ये काँग्रेसच्या बंडखोराने माघार घेतलेली नाही

विधान परिषद निवडणुकीत कुरघोडीचे राजकारण; अशोक चव्हाण यांना तोडग्याची अपेक्षा

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसला शह देण्याकरिता भाजप आणि राष्ट्रवादीने पडद्याआडून हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. मुंबई आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्यास नगर आणि सोलापूरमध्ये इंगा दाखविण्याच्या पर्यायावर काँग्रेसमध्ये विचार सुरू झाला आहे.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये पवारांनी काँग्रेसला लक्ष्य केले. विशेषत: राजीव गांधी आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या धोरणांवर टीका केली आहे. पवारांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वाला खापर फोडण्यात आले आहे. ही पाश्र्वभूमी असतानाच राज्यातील विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने घेतलेल्या वेगळ्या भूमिकेकडे राज्यातील काँग्रेस नेते लक्ष वेधीत आहेत. मुंबईत प्रसाद लाड हे पक्षनेतृत्वाचा आशीर्वाद असल्याशिवाय अर्ज भरणे अशक्य आहे. लाड यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. भाजपने उमेदवारी मागे घेणे, त्याच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस (आता त्यांनी राजीनामा दिला) लाड यांची उमेदवारी रिंगणात ठेवणे हे राष्ट्रवादी आणि भाजपने ठरवून केल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजप, राष्ट्रवादी व अन्य नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांच्यापेक्षा जास्त मते मिळवून लाड यांना विजयी करण्याचे ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र’ हे ध्येय असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रयत्न असल्याची मार्मिक प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त
केली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या विरोधात रिंगणात असलेल्या महादेव महाडिक यांना भाजपचा पाठिंबा असून, राष्ट्रवादीचे काही नेते त्यांना मदत करण्याची शक्यता आहे. महाडिक यांचे पुतणे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत.
मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये वेगळी राजकीय समीकरणे अस्तित्वात आल्यास काँग्रेसला विजयाचे गणित साधण्यास अवघड जाऊ शकते.
राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका आल्यानेच नगरमध्ये काँग्रेसच्या बंडखोराने माघार घेतलेली नाही. राष्ट्रवादीने काही वेगळा विचार केल्यास नगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेसही राष्ट्रवादीला धडा शिकवू शकते.

मुंबईमध्ये माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली होती. पण राष्ट्रवादीचा बंडखोर रिंगणात आहे. यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होईल. आघाडीत ठरल्याप्रमाणे व्हावे, अशी आमची इच्छा आहे. माघारीची मुदत टळली असली तरी अजूनही मार्ग निघू शकतो.
-अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेतून ठरल्याप्रमाणेच होईल. मुंबईत प्रसाद लाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मुंबईत राष्ट्रवादीचे नगरसेवक हे काँग्रेसच्या भाई जगताप यांनाच मतदान करतील.
-नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Doubt to alliance between bjp and ncp

ताज्या बातम्या