मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे सुरू केलेले ऐतिहासिक ”बुद्ध भूषण मुद्रणालय” आणि ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन” यावर जून २०१६ मध्ये मध्यरात्री पाडकाम कारवाई करण्यात आली. या घटनेचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच चिंता व्यक्त केली. तसेच हा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) किंवा एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा विचार करण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील ऐतिहासिक ”बुद्ध भूषण मुद्रणालय” आणि ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन” २०१६ मध्ये रात्रीच्या वेळी पाडण्यात आले होते. त्याची स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

त्यावेळी, आपला, तक्रारदार आनंदराज आंबेडकर आणि भवनाच्या मूळ विश्वस्तांचे जबाब अद्याप नोंदवण्यात आले नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच हे प्रकरण २०१६ मधील असून आपण ऑगस्ट २०२६ मध्ये आहोत, तेव्हापासून आतापर्यंत कितीजणांचे जबाब नोंदवले? अशी विचारणाही खंडपीठाने सरकारकडे केली.

तथापि, २५ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले असून विश्वस्तांचे जबाब अद्याप नोंदवण्यात आलेले नाहीत, अशी कबुली अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयात दिली. तसेच, तक्रार नोंदवण्यात आल्याचेही न्यायालयाला सांगितले. त्यावर याचिकाकर्त्याचा जबाब तात्काळ नोंदवून घ्या. तसेच सकृतदर्शनी प्रकरणाकडे पाहता, तपासात त्रुटी असल्याचे दिसून येते.

त्यामुळे, प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबत विचार करा, असे न्यायालयाने राज्य सरकारच्या वतीने उपस्थित महाधिवक्त्यांना सुचवले. या सूचनेचा विचार करून पुढील सुनावणीदरम्यान तपासाची प्रगती व नोंदवलेल्या जबाबांचा तपशील देणारा अद्ययावत अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले, त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली.