मुंबई : ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ हा संदेश देत भीम जयंतीचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी रंगला. नेहमी प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या सीएसएमटीत शिवरायांच्या जयघोषांने आणि भीम गीतांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. ऑल इंडिया एस.सी/ एस.टी रेल्वे एम्प्लाॅईज असोसिएशन, मोटरमन/ ट्रेन मॅनेजर उपनगरीय लाॅबीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संगम पाहायला मिळाला.
कलाकारांनी सादर केलेल्या पोवाडे, गीते आणि घोषणांमधून समाजात शांतता, समता आणि बंधुता यांचा संदेश देण्यात आला. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ हा संदेश देत या उपक्रमातून हिंसेपेक्षा विचारांची ताकद मोठी असल्याचे अधोरेखित करण्यात आले. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम राबवून प्रवाशांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट देशावर पडले आहे. दुसऱ्या देशातील युद्धाचे परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागत आहेत. तसेच युध्द सुरू असलेल्या देशातील नागरिकांची परिस्थिती भयावह आहे. अशा युद्धांमुळे कोणाचेही भले होत नाही. सर्वांनी बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने जावे, अशा आशयाचा देखावा तयार केला होता.
कार्यक्रमात प्रबोधनात्मक भाषण, शिवरायांचे पोवाडे, भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले. सकाळपासून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थानकात त्रिशरण पंचशील आणि महापुरूषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले. सीएसएमटी परिसरात सांस्कृतिक आणि सामाजिक संदेशांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. सुट्टीचा दिवस असल्याने, स्थानकात गर्दी कमी होती.
प्रवाशांना रहदारी करण्यास त्रास झाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सीएसएमटी स्थानकात निळे आणि पंचरंगी झेंडे लावण्यात आले होते. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात भीम जयंती साजरी झाली.
लोकल डब्यात डॉ. आंबेडकर जयंती साजरी
मध्य रेल्वेवरील अनेक प्रवासी वर्ग मोठ्या उत्साहात सण-उत्सव, महापुरुषांची जयंती साजरी करतात. सोमवारी आणि मंगळवारी प्रवासी संघटनांनी आणि दररोजच्या प्रवाशांनी लोकलच्या डब्यांना निळ्या पताका, झेंड्यांनी सजवून मोठ्या उत्साहात डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी केली. काही प्रवाशांनी भीम गीते गाऊन आनंद व्यक्त केला.
