मुंबई : ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलन व्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही सुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, ॲड.आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे आदी उपस्थित होते.

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधील संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारित पुढे रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.‘गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत बाबासाहेबांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमास सर्वपक्षीय स्थानिक आमदार, खासदार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर आदींसह भीमानुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल, उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?

डॉ. आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण व वेगवान विकास साधणे हेच त्यांना अभिवादन असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी :

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी चैत्यभूमीवरील स्तुपामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते उपस्थित सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एक वर्षाच्या कामकाजावर आधारित ‘समाजनायक संजय शिरसाट’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आभार व्यक्त केले.