मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ-भोईवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकासाठी १५ कोटी ७० लाख रुपयाचा निधी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून शुक्रवारी मंजूर करण्यात आला आहे. हे स्मारक आनंदराज आंबेडकर अध्यक्ष असलेल्या बौद्धजन पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली उभारले जात आहे.

१९१२ ते १९३४ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय परळ येथील बीआयटी चाळीत वास्तव्यास होते. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ याच चाळीत व्यतीत केला. सध्या या परिसराचा पुनर्विकास गतीने होत आहे. बाबासाहेबांशी संबंधित वास्तू नष्ट होऊ नयेत यासाठी येथे स्मारक करावे, अशी अनेक वर्षांची मागणी होती. मागच्या वर्षी या स्मारकाचा २६ काेटीचा आराखडा मंजूर करण्यात आला.

येथील जुन्या वास्तूच्या जागेवर आधुनिक बहुउद्देशीय स्मारक उभारण्यासाठी पायाभूत कामे व प्राथमिक आराखड्यानुसार कामाला गती दिली जात आहे. प्रकल्पाची कार्यन्वय यंत्रणा म्हणून समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त आणि बौद्धजन पंचायत समितीची नेमणूक करण्यात आली. स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचे दालन, ग्रंथालय आणि सामाजिक-सांस्कृतिक केंद्र करण्याचे नियोजन आहे.

बौद्धजन पंचायत समिती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली बौद्ध समाजाची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मुंबई- कोकणातील लाखो दलित-बहुजन बांधवांना संघटित केले. समितीचे अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर आहेत. समितीने स्मारकाशी संबंधित विविध शुल्कापोटी पाच कोटी रुपये खर्च केले आहेत. दादरच्या इंदु मिलमध्ये ११ एकर परिसरात उभारण्यात येत असलेले बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आनंदराज यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लीकन सेनेने आंदोलन केल्यानंतर सरकारने घोषणा केली होती.