मुंबई : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारने वाढ केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणानुसार वर्षाला ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरिता दरवर्षी आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत.
राज्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि अन्य शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता अकरावी, बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते.
राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलांसाठी २३१ आणि मुलींसाठी २१८ अशी एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मात्र, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने वसतिगृहांतील जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे पात्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांत प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शिक्षणाच्या ठिकाणानुसार अनुदान
- स्वाधार योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता अशा तीन बाबींसाठी अनुदान दिले जाणार आहे.
- मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी : वार्षिक ८० हजार रुपये.
- इतर महसुली विभागांतील शहरांमध्ये आणि उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रांत शिक्षण घेणारे विद्यार्थी : वार्षिक ६८ हजार रुपये.
- इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरातील महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी : वार्षिक ५७ हजार रुपये.
- तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी : वार्षिक ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
शैक्षणिक साहित्याकरिता स्वतंत्र मदत
वरील अनुदानाव्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये शैक्षणिक साहित्याकरिता एकरकमी देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे, शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी पात्र असणे आणि प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेला असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्याने अकरावी, बारावी किंवा बारावीनंतरच्या व्यावसायिक अथवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
