मुंबई : दिल्लीहून आइजोलकडे जाणाऱ्या इंडिगोच्या ६ ई २९१ विमानातील एका प्रवाशाची प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडली. प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने परिस्थिती गंभीर बनली. त्यावेळी विमानात प्रवास करणारे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि डॉक्टर भागवत कराड यांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला.

प्रवाशाची प्रकृती लक्षात घेऊन डॉ. कराड यांनी विमानातील उपलब्ध वैद्यकीय साधनांच्या मदतीने उपचार सुरू केले. प्रवाशाला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन देण्यात आला. विमानातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रवाशाला आवश्यक वैद्यकीय मदत देत प्रकृती स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

विमान आइजोल विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवाशाला ऑक्सिजनच्या सुविधेसह रुग्णवाहिकेतून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. विमानातील आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर म्हणून डॉ. कराड यांनी तातडीने पुढाकार घेतला. यामुळे प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.