भोंदू डॉक्टर संतोष पोळने खून करून पुरलेले सहा मृतदेह खोदून काढणारा सफाई कामगार सुभाष चक्के याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा धसका घेतल्याने चक्के यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अनैतिक संबंध आणि पैशाच्या मोहातून सातारा जिल्ह्य़ातील वाईनजीक धोम गावात संतोष पोळ या भोंदू डॉक्टरने गेल्या १३ वर्षांत तब्बल सहा खून केल्याचे नुकतेच उघड झाले होते. अंगणवाडी सेविका मंगला जेधे हत्याकांडाचा छडा लावताना पोळचे हे अमानुष कृत्य समोर आले होते. सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, गजाबाई पोळ, सलमा शेख आणि मंगला जेधे या पाच महिलांची आणि नथमल धनाजी भंडारी यांची हत्या पोळने केली होती.
पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर पोळने आपल्या कृत्याची कबुली देऊन मृतदेह पुरल्याची जागा दाखवली होती. पुरलेल्या ठिकाणावरून मृतदेह खोदून काढण्यासाठी पोलिसांनी सफाई कामगार सुभाष चक्के याच्यासह इतर कामगारांची मदत घेतली होती. याचाच धसका सुभाष यांनी घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.