मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा डाॅ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार-२०२५ रती भोसेकर लिखित ‘बालशिक्षण एक अद्भुत सफर’ या ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०२५ साठी चार सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात आली होती. २०२५ या वर्षातील पुरस्कारासाठी राज्यभरातून ४६ ग्रंथ आले होते. या पुरस्कारासाठी स्थापन केलेल्या समितीने त्या ग्रंथाचे आशय, प्रयोगशीलता, स्वतःचे अनुभव आणि उपयुक्तता, तसेच मांडणी, भाषाशैली व नवा दृष्टिकोन या मुद्द्याच्या आधारे परीक्षण केले. या पुस्तकांमध्ये शिक्षणविषयक एखादा नवीन प्रयोग मांडण्यात आला आहे का ? तो प्रयोग इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरण्याजोगा आहे का ? याचे परीक्षण केले. तसेच या पुस्तकांमधून शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, याचा विचार करून समितीने ‘बालशिक्षण एक अद्भुत सफर’ या रती भोसेकर लिखित पुस्तकाला डाॅ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०२५ जाहीर केला.
बाल शिक्षण या विषयातील अस्सल आणि जिवंत अनुभव, शाळेमध्ये त्यांनी केलेले नवे प्रयोग या पुस्तकामध्ये ओघवत्या शैलीत लेखिकेने मांडले आहेत. याशिवाय तीन लक्षवेधी पुस्तकांमध्ये डॉ. सुचिता पाटेकर लिखित ‘नावीन्यातून नैपुण्य’, भरत पाटील लिखित ‘फुलताना’ आणि डॉ. वर्षा गट्टू, डॉ. पूनम सावंत व डॉ. अतुल जाधव लिखित ‘उन्नती समावेशित शिक्षणाची’ याचा समावेश आहे. एकवीस हजार रूपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, प्रकाशकाचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय, तीन लक्षवेधी पुस्तकांच्या लेखकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ ४ जानेवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित १६ व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
