मुंबई : एरोजेल्स आणि थर्मल इन्सुलेशन या अत्याधुनिक संशोधन क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे डॉ. प्रदीप सरवदे यांनी उल्लेखनीय जागतिक कामगिरी नोंदवली आहे. पांडित्य तालिकेच्या (स्कॉलर्ली इंडेक्स) आघाडीच्या १००० संशोधकांमध्ये २०२६ या मानांकनात जीवनकालीन संशोधन प्रभावाच्या आधारे डॉ. सरवदे यांनी जगातील अव्वल १००० संशोधकांमध्ये २२२ वा क्रमांक, तर भारतातील संशोधकांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. या मानांकनामुळे डॉ. सरवदे यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील दखल अधोरेखित झाली आहे.
डॉ. सरवदे हे मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू नॅनो सच्छिद्र पदार्थ, सिलिका एरोजेल्स, कार्बन एरोजेल्स, नॅनोपदार्थ, ऊर्जा-साठवणूक पदार्थ व शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान हा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘ॲडव्हान्स मटेरिअल्स अँड एनर्जी रिसर्च लॅबोरेटरी’ या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन सुरू आहे. अव्वल १००० स्कॉलर २०२६ या प्रमाणपत्रानुसार डॉ. प्रदीप सरवदे यांचा ९५.३५ इम्पॅक्ट स्कोअर असून ते जगातील अव्वल १.७ टक्के संशोधकांमध्ये आहेत. त्यांचा डी-इंडेक्स १६ व एच-इंडेक्स ३३ आहे. एरोजेल्सच्या अत्यल्प वजन, उच्च सच्छिद्रता व कमी उष्णता वाहकतेमुळे ऊर्जा-कार्यक्षम थर्मल इन्सुलेशन, अवकाश व बांधकाम तंत्रज्ञान, पर्यावरणीय शुद्धीकरण, ऊर्जा साठवणूक व हरित तंत्रज्ञानासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. या दिशेने डॉ. सरवदे यांच्या संशोधनातून भविष्यातील शाश्वत तंत्रज्ञानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जात आहे.
– ॲडव्हान्स मटेरिअल्स अँड एनर्जी रिसर्च लॅबोरेटरीच्या माध्यमातून आतापर्यंत १६० संशोधन लेख व ४ भारतीय पेटंट नोंदविण्यात आले आहेत. केमिकल इंजिनीअरिंग जर्नल, जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी, जर्नल ऑफ मटेरिअल केमिस्ट्री यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.
– या संशोधनामुळे शाश्वत ऊर्जा, ऊर्जा साठवणूक व प्रगत कार्यक्षम पदार्थांच्या क्षेत्रातील मुंबई विद्यापीठाच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृश्यमानता मिळाली आहे.
– डेन्मार्क, सौदी अरेबिया व ऑस्ट्रेलियातील नामांकित संशोधन संस्थांशी त्यांचे सहकार्य असून डॉ. सरवदे यांना मिळालेले हे मानांकन मुंबई विद्यापीठातील प्रगत पदार्थ व नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील संशोधनाची वाढती जागतिक व्याप्ती अधोरेखित करणारे ठरले आहे.
मुंबई विद्यापीठ व निधी पुरविणाऱ्या संस्थांचे आभार. आंतरविद्याशाखीय संशोधन व वैज्ञानिक नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे सहकार्य व जागतिक ऊर्जा व पर्यावरणीय आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी विद्यापीठातील संशोधनपूरक वातावरणामुळे ॲडव्हान्स मटेरिअल्स अँड एनर्जी रिसर्च लॅबोरेटरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करता आले. – डॉ. प्रदीप सरवदे, संशोधक, मुंबई विद्यापीठ
