मुंबई : हवामान बदलाचा परिणाम जगासह भारतावरही होत असून ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. तापमान वाढीचाही आपण सामना करत असून उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी होणाऱ्या लग्नाच्या वेळा बदलून लग्न समारंभ सायंकाळी ठेवायला हवेत, असे मत राज्याच्या साथरोग विभागाचे माजी सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी गुरुवारी व्यक्त केले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत शहरांमधील उद्याने दुपारच्या वेळेतही खुली ठेवायला हवीत, असेही त्यांनी सांगितले.

असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायझर्स संस्था, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई आणि मुंबई प्रेस क्लब यांच्यावतीने ‘उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान वार्तांकन’ या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख बिक्रम सिंह यांनी हवामान विभागाकडून नियमितपणे दिले जाणारे हवामान अहवाल तसेच वेळोवेळी उष्णतेविषयी दिले जाणारे इशारे, उष्णतेची लाट कधी जाहीर केली जाते याविषयी निकष काय असतात, याविषयी तसेच हवामान अहवालांसंदर्भात इतर मुद्द्यांविषयी माहिती दिली.

डॉ. प्रदीप आवटे यांनी उष्णतावाढीमुळे होणारे परिणाम सांगतानाच आरोग्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली. आपल्याकडे उन्हाळा हा लग्न सराईचा हंगाम असतो आणि लग्नाचे मुहूर्तही भर दुपारी बाराच्या सुमारास असतात. विशेषतः ग्रामीण भागात अनेक लग्नसमारंभ दुपारच्या वेळी होतात. तसेच लग्नातील जेवण झाल्यांनंतर अनेकजण उन्हाची पर्वा न करता नाचतात. तीव्र उन्हातील या कृतीमुळे अगदी पंचविशीतल्या तरुणांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही आपल्याकडे घडल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करता आपल्याकडे लग्न समारंभाच्या वेळा बदलून ते समारंभ सायंकाळी करण्याची नितांत गरज आहे, असे आवटे यांनी सांगितले.

उद्याने दुपारच्या वेळेतही खुली ठेवण्याची गरज

आपल्याकडे उद्याने दुपारी बंद केली जातात. मात्र, उन्हाळाच्या दिवसांत उद्यानाच्या वेळांमध्ये बदल करून दुपारीही उद्याने सुरु ठेवण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच धार्मिक स्थळेही उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी सुरु ठेवायला हवीत जेणेकडून उन्हातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तिथे आसरा घेता येईल. हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार नागरिकांनी जागरूक राहायला हवे, उन्हाळ्याच्या दिवसात आहारात बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मानसिक त्रासात होणारी वाढ लक्षात घेता, नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.