Dr Sangram Patil News : लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना आज मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर ॲड.असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, संग्राम पाटील यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लिखाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी संग्राम पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचं संग्राम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात आपण कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याचं संग्राम पाटील यांनी सांगितलं आहे.

संग्राम पाटील काय म्हणाले?

“मी फेसबुकवर लिहित असतो, त्यातील काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तक्रार करत एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतलं होतं. आज दिवसभर चौकशी करून आता मला नोटीस दिली आणि आता पुढील तपास सुरू झाला आहे. कोणत्यातरी एका राजकीय ग्रृपची एक पोस्ट आहे आणि त्याबरोबर मला क्लब करून टाकलं आहे. मात्र, यावर मी आता जास्त काही बोलणार नाही. चौकशीतून योग्य ते समोर येईल”, असं संग्राम पाटील यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

असीम सरोदे यांनी पहिल्या पोस्टमध्ये काय म्हटलं?

“संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतलं. त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे २ वाजल्यापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात घेतलं. खरं तर हे अन्याकारक आहे. संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत, त्यांच्यामध्ये डॉ. संग्राम पाटील यांचं नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझं भाषण आयोजित केलं होतं. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडतील असं दिसत आहे. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावलं उचलण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये. आशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही”, असं असीम सरोदे यांनी फेसबुक वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Asim Sarode On Dr Sangram Patil
असीम सरोदे यांची संग्राम पाटील यांच्याबाबत पोस्ट

असीम सरोदे यांनी आणखी एका पोस्टमध्ये काय म्हटलं?

Asim Sarode On Dr Sangram Patil
असीम सरोदे यांची संग्राम पाटील यांच्याबाबत पोस्ट

“डॉ. संग्राम पाटील यांना पहाटे २ वाजल्यापासून अटकाव करून ठेवल्यावर १५ तासांनंतर सोडण्यात आलं आहे आणि ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे रवाना झाले आहेत. केवळ युकेचे (United Kingdom) नागरिकत्व असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पोलिसांनी जो त्रास दिला व छळ केला त्याचा निषेध. भारतातून जातांना पोलिसांना भेटून जावं असं बंधन त्यांच्यावर घालण्यात आलेलं आहे. संग्राम पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आणि ते सुरक्षित आहेत”, असं असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.