Premium

‘एमएमआरडीए’ आयुक्तपदी डॉ. संजय मुखर्जी ,मनीषा म्हैसकर बांधकाम सचिव, अनिल डिग्गीकर ‘सिडको’मध्ये

राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदावरून श्रीनिवास यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यावर या पदासाठी अनेक अधिकारी इच्छुक होते.

Dr Sanjay Mukherjee, Manisha Mhaiskar, Anil Diggikar
(डॉ. संजय मुखर्जी, मनीषा म्हैसकर, अनिल डिग्गीकरण)

मुंबई : लाखो कोटींची कामे सुरू असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणावर वर्णी लावण्यासाठी मोठी स्पर्धा असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांमधील मानले जाणारे डॉ. संजय मुखर्जी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मनीषा म्हैसकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदी, तर अनिल डिग्गीकरण यांची ‘सिडको’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदावरून श्रीनिवास यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यावर या पदासाठी अनेक अधिकारी इच्छुक होते. त्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. ‘एमएमआरडीए’ आयुक्तपदासाठी डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह अश्विनी भिडे यांच्या नावाची चर्चा होती. डॉ. मुखर्जी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासातील, तर भिडे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमधील मानल्या जातात. पण, मुंबईतील किनारी मार्ग (कोस्टल रोड) तसेच कुलाबा ते सिप्झ हा भुयारी मेट्रो-३ या राज्य सरकारच्या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे असल्याने हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यांना त्या पदावर कायम ठेवावे, असा निर्णय झाल्याचे समजते.

डॉ. संजय मुखर्जी यांची मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६च्या तुकडीतील डॉ. मुखर्जी हे मूळचे नागपूरचे आहेत. सध्या ते ‘सिडको’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी होते. त्याआधी त्यांनी नागपूर जिल्हाधिकारी आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये काम केले आहे. ‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदावरून काल बदली करण्यात आलेले अनिल डिग्गीकर यांची ‘सिडको’च्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मनीषा म्हैसकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करतानाच त्यांच्याकडे राजशिष्टाचार विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांची शुक्रवारी नगरविकास विभाग-२च्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. पण, अवघ्या २४ तासांत या बदलीच्या आदेशात बदल करण्यात येऊन शर्मा यांची ‘एमएमआरडीए’च्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावरील गोविंदराज यांची शर्मा यांच्या जागी नगरविकास विभाग-२ या पदावर बदली करण्यात आली आहे.

पुढील आठवडय़ात आणखी बदल्या

पहिल्या टप्प्यात शुक्रवारी बदली झालेले काही अधिकारी अद्याप नव्या जबाबदारीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय बदली झालेल्या नाशिक महापालिका आयुक्तांसह काही पदांवर नव्याने नियुक्त्या झालेल्या नाहीत. पुढील आठवडय़ात आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांबाबत उत्सुकता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 01:48 IST
Next Story
केवळ मोदींचा करिष्मा, हिंदूत्व निवडणूक जिंकण्यासाठी अपुरे! भाजपच्या कर्नाटक पराभवावर ‘द ऑर्गनायझर’मध्ये परखड विवेचन