,मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस समितीने सहा राज्यांना नवे प्रभारी शनिवारी नियुक्त केले आहेत.त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून आंध्र प्रदेशचे डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांना नेमले आहे. डॉ. प्रसाद हे अर्थतज्ञ असून दलित नेते आहेत. तमिळनाडू आणि झारखंड राज्याचे सहप्रभारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २०१९ मध्ये डॉ. प्रसाद यांनी आंध्र प्रदेशमधील ओंगाले या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. 

केरळचे रमेश चेन्नीथला महाराष्ट्रात राज्य प्रभारी म्हणून कार्यरत होते. मात्र सध्या ते केरळचे गृहमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे गेले चार महिने महाराष्ट्राचे पद रिक्त होते. शनिवारी सहा राज्यांच्या प्रभारींच्या नियुक्त्या काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केल्या. त्यामध्ये भूपेश बघेल यांना आसाम, रणजीत सिंग सुरजेवाला यांना गुजरात, सचिन पायलट यांना पंजाब, सुखदेव भगत यांना छत्तीसगढ आणि पी. व्ही. मोहन यांना आंध्र प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त केले. 

राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. हर्षवर्धन सपकाळ हे एकट्याने राज्यात पक्षाचा किल्ला लढवत आहेत. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आहेत. राज्य प्रभारी म्हणून डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांची आता निवड झाली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून पक्षनेतृत्वाने कायम दक्षिणेतील नेत्यांना पाठवलेले आहे. मल्लिकार्जून खरगे, एच. के. पाटील, रमेश चेन्नीथला हे अलिकडले दक्षिणी नेते महाराष्ट्राचे प्रभारी होते.