मुंबई : ‘लोकशाही मूल्ये जपणार्‍या देशासाठी आपण स्वत: काय योगदान देतो, हे महत्त्वाचे आहे. फक्त मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही नव्हे’, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वरूप संपत-रावल यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही पोर्तुगीजांनी, मुघलांनी, इंग्रजांनी आमच्यावर आक्रमणे करून आम्हाला उद्ध्वस्त केले, हे रडगाणे आपण अजून किती काळ गात बसणार? सतत इतिहासाचे दाखले देत स्वत:चेच नुकसान करून घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काम केले तर भारताला आपण खर्‍या अर्थाने पुन्हा वैभवशाली बनवू शकतो, असे त्या म्हणाल्या.

‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ दानयज्ञाचा सांगता सोहळा मंगळवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात असलेल्या करिश्मा सभागृहात झाला. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री आणि गेली २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्वरूप संपत-रावल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य उभारणार्‍या ११ संस्थांना डॉ. स्वरूप संपत-रावल आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रवीणकुमार गांधी यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. अभिनेत्री म्हणून मिळालेले यश, विवाहानंतर घरसंसार आणि दोन मुलांमध्ये रमल्यानंतर वयाच्या ३८ व्या वर्षी शिक्षण घेऊन समाजकार्याकडे आपण कसे वळलो, याबाबतच्या आठवणी डॉ. स्वरूप संपत यांनी या वेळी सांगितल्या.

‘पदव्युत्तर शिक्षणाचा भाग म्हणून प्रबंध लिहीत असताना मी देशातल्या मुलांसाठी काम करेन, असे लिहून गेले आणि खरोखरच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विशेष मुलांना शिक्षण देण्याचे कार्य मी सुरू केले. ज्या काळात घरच्यांची जबाबदारी न सांभाळता घराबाहेर पडून लोकांसाठी काम करणार्‍या स्त्रियांना समाजाकडून सन्मान दिला जात नसे, त्या काळात मी एकटीने मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. सुरुवातीला माझ्याकडे विशेष मुले, गतिमंदत्व असलेली, अतिक्रियाशीलतेच्या समस्येशी झुंजणारी आठ मुले शिकत होती.

नाटकाच्या माध्यमातून या मुलांना शिक्षण देणे शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर मी त्या पद्धतीचे काम सुरू केले. अमरावती, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद अशा महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यांमध्येही मुलांना शिक्षण देण्याचे, शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे,’ असा आपला समाजकार्याचा प्रवास उलगडून सांगतानाच वंचितांसाठी शिक्षणकार्य उभारण्यासाठी सरकारकडून मदत मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शारीरिक वा मानसिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍यांना कौशल्य शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी १९९८ पासून मी मागणी करते आहे, आज २०२६ उजाडले तरी आपल्याकडे अशांसाठी कौशल्य शिक्षण देणारी कोणतीही योजना नाही, या वास्तवाकडे लक्ष वेधतानाच त्यांनी सरकार काहीच करत नाही म्हणून आपणही शांत बसणे योग्य नाही, समाजातील जे प्रश्न, समस्या आपल्याला अस्वस्थ करतात त्यासाठी आपल्याला स्वत:हूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा लोकसत्ताचा उपक्रम गेली १५ वर्षे सुरू असून राज्यातील विविध प्रांतांत सामाजिक कार्य करणार्‍या संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात आणि त्यांना मदत करू इच्छिणार्‍या लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचावी, हा त्यामागील उद्देश असतो, अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या उपक्रमाची ओळख करून दिली. महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचा देश आहे, असे न्यायमूर्ती रानडे म्हणाले होते. ‘सर्वकार्येषु सर्वदा’सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणारे लोक एकमेकांशी जोडले जावेत, हाही उद्देश आहे आणि म्हणूनच या संस्थांना जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून धनादेशाचे वाटप केले जाते, असेही कुबेर यांनी सांगितले.

राज्यभरात विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य उभारणार्‍या संस्था शोधून, त्यांचे काम जोखून त्यांची या उपक्रमासाठी निवड करणे हे अत्यंत जिकिरीचे काम आहे. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून या संस्थांचा आवाज सर्वदूर पोहोचतो आणि वाचकांच्या धनादेशाचा ओघ सुरू होतो. गेली दहा वर्षे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक ‘सर्वकार्येषु सर्वदा’सारख्या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाशी ‘लोकसत्ता’बरोबर जोडली गेली आहे, याचा आनंद वाटतो, अशी भावना कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे प्रवीणकुमार गांधी यांनी व्यक्त केली. या सांगता सोहळ्याचे सूत्रसंचालन किन्नरी जाधव यांनी केले.

संस्थांचा सन्मान दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काम करणारी मुंबईतील ‘आभा परिवर्तनवादी संस्था’, मेंदूची अपुरी वाढ, बहुविकलांगपणा यामुळे विकासाची गती संथ असलेल्या मुलांसाठी कार्यरत असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ‘आधार मतिमंद निवासी विद्यालय’, आदिवासी, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठांत शिष्यवृत्ती मिळवून देणारी ‘एकलव्य’ संस्था, १५० शाळांना भेट देणारी ‘विज्ञानवाहिनी’ ही फिरती प्रयोगशाळा, भटके कुत्रे, मांजरांसाठी काम करणारी मुंबईतील ‘आवाज व्हॉइस ऑफ स्ट्रे ॲनिमल्स’ ही संस्था, मनोविकाराने ग्रासलेल्यांंना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देणारे डोंबिवलीतील ‘मनोदय ट्रस्ट व मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’, वाचनसंस्कृती लयाला गेल्याचे दावे खोडून काढणारे ‘रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय’, गरीब आजारी रुग्णांची शुश्रूषा करणारी छत्रपती संभाजीनगरची ‘स्नेह सावली’, कुटुंबीयांनी वार्‍यावर सोडलेल्या व्यक्तींसाठी काम करणारेी ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’, फासेपारधी समाजातील मुलींना शिक्षण देणारे ‘आम्ही सार्‍या सावित्रीच्या लेकी’ हे आश्रयालय आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कार्यरत ‘उचल फाऊंडेशन’ला धनादेशाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्यभरातून नागरिकांनी उपस्थिती लावली