मुंबई : लोकसंस्कृतीचा प्रवाह आदिम ते अद्यातन असा चालत आलेला आहे. तुमच्यामाझ्यात आजही आदिमतेचे अंश आहेत. मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांच्या वाटचालीनुसार आपल्यात बदल होत असतात, पण आपल्या आदिमतेचे अंश पूर्णपणे गळून पडत नाही. जीव जन्माला आला, जंगली अवस्थेत गेला, शिकार करून जगायला लागला या प्रत्येक टप्प्यावरचे आदिमतेचे अंश तुमच्याआमच्या जगण्यामध्ये, चालीरिती, रुढी, भाषा, धर्म, जाणिवा, समजूती यामध्ये आढळतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपली नखे का वाढतात? या नखांनी माणूस शिकार करत होता, ओरबाडून घेत होता, याची जाणीव करून देणारा हा जैविक अवशेष आजही जिवंत आहे. मात्र त्यामागची शिकारीची मानसिकता वाढते आहे हे पाहता माणसातील जनावर जिवंत आहे हे जाणवते, अशी स्पष्टोक्ती डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या विषयांच्या ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक आणि दिल्लीतील नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना गुरुवारी ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाच्या पुरस्कारप्राप्त नवदुर्गा, प्रसिध्द अभिनेत्री रत्ना पाठक शाह, लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या अध्यक्षा ज्योति म्हापसेकर यांच्या हस्ते भवाळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामान्यातून असामान्य कर्तृत्व उभारणाऱ्या ९ कर्तबगार स्त्रियांचा सन्मान दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात झालेल्या लोकसत्ता दुर्गा पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.
हेही वाचा >>> ‘लोकसत्ता लेक्चर’मध्ये उद्या न्या. चंद्रचूड यांचे व्याख्यान
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, केसरी टूर्सच्या सुनीता पाटील, पितांबरीच्या प्रिया प्रभुदेसाई, चितळे डेअरीचे अविनाश इनामदार, टीजेएसबी बँकच्या अस्मिता सुळे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइजर्सचे उप महाप्रबंधक मधुकर के. पाचारणे यांच्या हस्ते नवदुर्गांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी भवाळकर म्हणाल्या, आदिमतेचा संबंध हा दुर्गेशीही आहे. आत्मसंरक्षण आणि सृष्टीक्षक असलेली दुर्गा ही आदिम देवता आहे. तक्रारी करत न बसता, स्वाभिमानाने उभ्या रहा, असा संदेश आपल्या कार्यातून देणाऱ्या या कर्तबगार स्त्रियांना याच आदिम शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गेच्या नावाने पुरस्कार दिला जातो आहे, अशा शब्दांत त्यांनी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ या उपक्रमाचे कौतुक केले.
१४ वर्ष रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून काम केल्यानंतर मी संशोधनाकडे वळले. नाटकाच्या माध्यमातूनच देशभर फिरत असताना लोककला, संतसाहित्य आणि विशेषत: संतस्त्रियांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव पडल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाने माणसाला शहाणपण येणे अपेक्षित असते, मात्र तसे होतेच असे नाही. परंतु, निरक्षर असलेल्या संतस्त्रियांनी आपल्या शहाणपणातून समाजाला वैचारिक दिशा दिली. लोककला आणि संतसाहित्याच्या माध्यमातून बौद्धिक, ज्ञानाचा जागर होणे अपेक्षित असते. मात्र अनेकदा त्यात अवैज्ञानिक गोष्टी घुसडल्या जातात. विज्ञानाच्या नावावर छद्मा वैज्ञानिक (स्युडो सायन्स) युक्तिवादांचे समर्थन केले जाऊ नये , असेही खडे बोल त्यांनी यावेळी सुनावले.
कर्तृत्त्वाचा सन्मान
‘सर्वसाधारणपणे हल्लीच्या बाजारपेठीय विश्वात लोकांमध्ये परिचित व प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींचा गौरव केला जातो. परंतु ‘दुर्गा’ पुरस्काराच्या माध्यमातून ही चौकट मोडली गेली. प्रसिद्धीपासून दूर आणि विविध ठिकाणी आपापल्या मातीमध्ये पाय घट्ट रोवून अनेकांना सावली देण्याचे काम करणाऱ्या स्त्रियांचा दुर्गा पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला जातो.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत, त्यामुळे यंदाचा दुर्गा पुरस्कार सोहळा विशेष महत्त्वाचा आहे. १९६० नंतर पुरोगामी व प्रागितिक महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळण्यासाठी खूप वर्षे लागली. त्यामुळे पुरूषी मानसिकतेतून प्रशासकीय पद्धत हाताळण्याचा जो चंग आपल्या व्यवस्थेतून बांधलेला होता, तो तोडण्यासाठी स्त्रियांना किती कष्ट करावे लागले असतील याची प्रचिती येते’, असे मत प्रास्ताविकात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. तर ‘दुर्गा’ पुरस्काराच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्त्रियांचा गौरव केला जातो. मात्र त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा आणि विविध आव्हानांना सामोरे जात मिळवलेल्या यशाचा हा सन्मान असतो, असे सांगतानाच यावेळच्या दुर्गांची निवड करण्याचे कठीण काम ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि ‘मौज प्रकाशन गृह’च्या मुख्य संपादिका, सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी केली आहे, अशी माहिती ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीच्या फीचर एडिटर आरती कदम यांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्यात सुजाता सौनिक यांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.‘‘स्त्री हे करु शकत नाही; ते करू शकत नाही, हा विचार बदलणे आवश्यक आहे. सध्याची पिढी रूढीवादी पद्धतीने विचार करत नाही. त्यांची स्वप्ने व एखादी गोष्ट करण्याची इच्छा मोठी आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात भरलेला आत्मविश्वास पाहता येणारी पिढी व समाज महिलांना निश्चितच योग्य स्थान व सन्मान देईल. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाल्यास आनंद असून याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोककलावंतांना दाद
यंदाच्या दुर्गा पुरस्कार सोहळ्यात सादर झालेला ‘जागर मराठमोळ्या लोकसंस्कृती’चा हा लोककला आणि लोकवाद्यो यांचा मिलाफ असलेला कार्यक्रम वैशिष्ठ्यपूर्ण ठरला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या नवदुर्गांचा संघर्ष, त्यांचे यश अपयश याचा लेखाजोखा अभिनेत्री, लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी त्यांच्या ओघवत्या सूत्रसंचालनातून उलगडला. तर या सोहळ्यात सादर झालेल्या ‘जागर मराठमोळ्या लोकसंस्कृती’चा या कार्यक्रमासह संपूर्ण सोहळा निवेदक कुणाल रेगे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून उपस्थितांसमोर उलगडला.