मुंबई : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे आयोजन केले आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत या अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश महामंडळाने जारी केले आहेत. या दिवशी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सणाला साजेसा पेहेराव या काळात करावा, असेही महामंडळाने आदेशात नमुद केले आहे. कर्मचाऱ्यांनी नीटनेटक्या गणवेशात कर्तव्यावर उपस्थित राहावे. तसेच या उपक्रमाचा अहवाल स्थानिक जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 राज्यातील प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यानुसार ९० हजार कर्मचारी आपल्या घरावर तिरंगा फडकावणार आहेत.  प्रत्येक बस स्थानकाच्या दर्शनी भागात तिरंगा फडकवावा, ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी राज्याच्या संस्कृतिक विभागाने संकेतस्थळावर उपलब्ध  केलेला जाहिरातीचा स्टिकर २५० आगारांतील प्रत्येकी पाच बस गाड्यांवर प्रदर्शित करावा, असे या आदेशांमध्ये म्हटले आहे. बेस्ट उपक्रमाच्या सर्व प्रमुख बसस्थानकांवर  १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान विदयुत रोषणाई करण्यात येणार आहे.  या अभियानाचे औचित्य साधून ९ ते १६ ऑगस्ट २०२२ दरम्यान एसटीमध्ये स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात सामुहिक प्रयत्नातून बसस्थानक, स्वच्छतागृहे, बसगाड्या आदींची स्वच्छता करण्यात येणार आहे.

मुंबई सेंट्रल, स्वारगेट, नाशिकमधील ठक्करबाजार, अहमदनगरमधील तारकपूर, सोलापूर सीबीएस, कोल्हापूर सीबीएस, नागपूर मोरभवन, अमरावती सीबीएस आगारात स्वातंत्र्य चळवळींचे  प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यानिमित्त आगारांमध्ये विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dress up national festival st corporation appeal employees mumbai print news ysh
First published on: 08-08-2022 at 15:06 IST