मुंबईत एका कारचालकाच्या चुकीमुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावर कारने अचानक वळण घेतल्याने दुचाकीने धडक दिली. यावेळी दुचाकीवर दोन तरुण होते. कारचालकाच्या चुकीमुळे दोन्ही तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. महत्वाचं म्हणजे अपघात झाल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून १५ हजारांच्या जामीनावर सुटका केली आहे.
२९ सप्टेंबरला हा अपघात झाला. २५ वर्षीय कृष्णा आणि भावेश संघवी दुचाकीवरुन जात होते. लोअर परळला ते बाईकवरुन जात असताना एल्फिस्टनवरुन महालक्ष्मीला जाणाऱ्या दुसऱ्या लेनमधील कारने अचानक टर्न घेतला. यामुळे त्यांच्या दुचाकीने कारला धडक दिली. यानंतर दोघेही दुचाकीसोबत फरफटत पलीकडच्या लेनमध्ये गेले आणि दादरच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीस्वालाही धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, भावेशचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा कुऱ्हाडकरचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाला अटक आणि सुटका
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. यानंतर एन एम जोशी मार्ग पोलिसांनी रेस्तराँचा मॅनेजर असणाऱ्या कारचालकाला अटक केली. अमित कुमार असं या आरोपी कारचालकाचं नाव असून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. जर अमित कुमारने वेळीच दोघांना रुग्णालयात उपचारासाठी नेलं असतं तर त्यांचा जीव वाचला असता असं त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. कठोर शिक्षेची मागणीही त्यांनी केली आहे.
अपघाताचं सीसीटीव्ही स्पष्ट नसल्याने पोलिसांना आरोपी कारचालकाचा शोध घेणं कठीण जात होतं. मात्र परिसरातील दुसऱ्या सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्यांनी कारचालकाचा शोध घेत अटक केली. नंतर त्याची १५ हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान सुटाक केल्याने पीडितांच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात असून कठोर शिक्षा देत न्याय देण्याची मागणी केली जात आहे.
एक वर्षाच्या चिमुरडीचं पित्याचं छत्र हरवलं –
कृष्णा याचं तर दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं आणि त्याला एक वर्षाची मुलगी आहे. आता तिचा कोण सांभाळ कऱणार ? अशी विचारणा त्याचा भाऊ रवी करत आहे. ठनायर रुग्णालयात नेल्यानंतर दीड तासाने त्याचा मृत्यू झाला. जर आरोपीने त्याला वेळेत रुग्णालयात नेलं असतं तर तो वाचला असता. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे”, अशी मागणी त्याने केली आहे.