मुंबई : देशातील रस्ते अपघाताचे प्रमाण वाढते असून अपघातात मृत्यू होणाऱ्यांचे नेत्रदान अनिवार्य करण्याची मागणी नेत्रतज्ञांनी केली आहे. नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान साजरा होत असलेल्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यादरम्यान ही मागणी जोर धरत आहे.

राज्यासह देशात दरवर्षी वाहनांची संख्या वाढत असून विविध कारणांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. यात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. मात्र अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी ज्यांचे नेत्र दान करता येऊ शकतात, त्यांचे नेत्रदान करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. दरवर्षी सुमारे २.५ लाख कॉर्नियाची आवश्यकता असताना केवळ ५० हजारांचे नेत्रदान होत आहे. त्यामुळे वाहन परवान्यांवर संबंधित व्यक्तीला नेत्रदानाची संमती अनिवार्य करण्यात यावी, अशी मागणी काही नेत्र तज्ज्ञांनी केली आहे.

अलिकडेच मुंबईत वाहन परवाना घेताना त्यावर अवयव दानांची संमती नोंदविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. भारताबाहेर अनेक देशांमध्ये वाहन परवाना प्रक्रियेत नेत्रदान, अवयवदान संमती अनिवार्य केली आहे. नेत्रदाना संबंधी वाहन परवान्यावर अधिकृत संमंती नोंदविली गेल्यास एखाद्या दात्याच्या मृत्यूनंतर नेत्रपेढ्यांना त्वरित कार्यवाही करण्यास मदत करू शकतो. प्रत्यारोपणासाठी मृत्यूनंतर सुमारे सहा तासांच्या आत कॉर्निया मिळवणे आवश्यक असते. जर वाहन चालविण्याच्या परवान्यावर संमती आधीच नोंदवलेली असेल, तर संबंधित नेत्रपेढीला त्वरित सूचित केले जाऊ शकते. ज्यामुळे कॉर्निया मिळवण्याच्या प्रक्रियेतील विलंब कमी होईल. नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या परवान्यावर लाल रंगाचा ठिपका असावा.

भारतात सुमारे १.८ कोटी नागरिक अंधत्वाने ग्रस्त आहेत, तर कॉर्नियाच्या नुकसानामुळे दरवर्षी अंदाजे २५ ते ३० हजार नवीन नागरिकांना अंधत्व येते. या रुग्णांपैकी एक मोठा भाग कॉर्निया प्रत्यारोपणाद्वारे आपली दृष्टी परत मिळवू शकतो. अमेरिकेत व्यक्तीचा नेत्रदान करण्याचा निर्णय त्याच्या वाहन परवान्यावर नोंदवला जातो. रुग्णालये देखील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांशी नेत्रदानाबाबत नियमितपणे संपर्क साधतात. मात्र, भारतात अशी कोणतीही प्रणाली नाही. तसेच महत्त्वाच्या वेळी नातेवाईकांशी अनेकदा संपर्क होत नाही.

संसद आणि न्यायालयांच्या प्रयत्नांनंतर सुमारे दशकभरापूर्वी महापालिका रुग्णालयांकडून जारी केल्या जाणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये नेत्रदानाची तरतूद करण्यात आली. मात्र कुटुंबीयांकडे नियमितपणे विचारणा होत नसल्याचे, नेत्ररोग तज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, कॉर्निया प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना सहा ते नऊ महिने थांबावे लागते. वाहनचालक परवाना संमती, रुग्णालये आणि नेत्रपेढ्या यांना जोडणारी एक सुसंघटित प्रणालीमुळे नेत्रदानात लक्षणीय वाढ होऊ शकते.

जगातील प्रमुख कॉर्निया दान करण्याच्या प्रमुख स्त्रोतांपैकी श्रीलंका हे प्रमुख राष्ट्र असले तरी, अमेरिकेत कॉर्निया प्रत्यारोपणाच्या दरवर्षी सुमारे ५० हजार शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचप्रमाणे श्रीलंकेमधून विविध देशांना दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक कॉर्निया पाठविले जातात.

रुग्णालये आणि नेत्रपेढ्या यांना जोडणारी एक सुसंघटित प्रणाली म्हणून वाहनचालक परवान्यातील संमती ही नेत्र दानात लक्षणीय वाढ करू शकते. त्याचप्रमाणे मागणी व उपलब्धता यामधील मोठी तफावत भरून काढण्यास मदत करू शकते. – डॉ. शशी कपूर, नेत्ररोगतज्ञ