चार महिन्यांहून अधिक काळ प्रशासनाची टोलवाटोलवी
गोपाळकाला जवळ येतोय, गणेशोत्सव तोंडावर आलाय, नवरात्रोत्सवाची लगबग आहे.. अशी एक ना अनेक कारणे देत पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयातील जल विभागामधील अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करत तब्बल चार महिने रहिवाशांच्या पाण्यासंदर्भातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले. यामुळे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ गिरगाव परिसरातील फणसवाडीमधील जगन्नाथ चाळ आणि आसपासच्या इमारतीमधील शेकडो रहिवाशांना मलयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. पण ही समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात ठेवून रहिवाशांची टोलवाटोलवी करण्यात पालिका अधिकारी वेळ वाया घालवत आहेत. आता या परिसरातील रहिवाशांचा उद्रेक झाला असून याच काळ्या मलयुक्त पाण्याने पालिका अधिकाऱ्यांना आंघोळ घालण्याचे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात रहिवाशी आहेत. तर या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकालाही आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
गिरगावमधील फणसवाडीमधील जगन्नाथ चाळ आणि आसपासचा परिसर पालिकेच्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत येतो. गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वीपासून जगन्नाथ चाळी आणि आसपासच्या इमारतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे.
या संदर्भात रहिवाशांनी सी विभाग कार्यालयातील जल विभागामधील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु आजतागायत या अधिकाऱ्यांना दूषित पाणीपुरवठय़ाचा शोध लावता आलेला नाही. दहीकाला, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव येत असल्याची कारणे देत अधिकाऱ्यांनी वेळ घालवला. साहाय्यक आयुक्तांकडे तक्रार गेल्यानंतर जल विभागातील अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे खोदून जलवाहिन्यांमध्ये कॅमेरे सोडले आणि दूषित पाणीपुरवठय़ाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आता पाण्याचा प्रश्न सुटणार अशी नागरिकांना आशा होती. परंतु दूषित पाणीपुरवठय़ाचा शोध काही लागला नाही. आजतागायत या रहिवाशांच्या घरी मलयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे.
दूषित पाणीपुरवठय़ावर मात्रा म्हणून काही ठरावीक ठिकाणी जलवाहिनीमध्ये स्वच्छ पाण्याचा मारा करण्यात येत असल्याचे पालिका अधिकारी वारंवार सांगत आहेत. परंतु स्वच्छ पाण्याचा मारा केल्यानंतर जलवाहिनीत साचलेले मलयुक्त पाणी नागरिकांच्या घरी जात आहे. सध्या १५ टक्के पाण्याची आणि २० टक्के पाणीपुरवठय़ाच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुळातच पाणी कमी वेळ येते. त्यातच सुरुवातीला १५ ते २० मिनिटे मलयुक्त काळे पाणी या रहिवाशांच्या घरी येत आहे. त्यामुळे नळ सुरू ठेवून पाणी सोडून द्यावे लागते. त्यानंतर स्वच्छ दिसणारे पाणी येत असले तरी त्याला प्रचंड दरुगधी येत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिक आजारी पडू लागले आहेत.
शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक संपत ठाकूर यांच्याकडेही नागरिकांनी तक्रार केली, परंतु त्यांनीही ही समस्या सोडविण्यासाठी फारशी धडपड केलेली नाही. आता हा प्रश्न अधिकच जटिल बनला असून पाण्याबरोबर कचराही लोकांच्या घरी येऊ लागला आहे. त्यामुळे रहिवाशांचा उद्रेक झाला आहे. या आठवडय़ात दूषित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्यात आला नाही तर सी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना याच काळ्या घाणेरडय़ा पाण्याने आंघोळ घालण्यात येईल, असा इशारा रहिवाशांकडून देण्यात आला आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर सर्वच पक्षांचे उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदारी फिरतात, पण समस्या सोडविण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकारण्यांना धडा शिकविण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे.