मुंबई : राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कृषी विभागाने मदत व पुनर्वसन विभागाकडे १६ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यामुळे दिवाळी पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांला पाच हजार रुपयांचा अग्रीम देण्याच्या प्रक्रियेला गती येणार आहे.

भंडारा जिल्ह्याचा पंचनाम्याचा अंतिम अहवाल प्रलंबित होता, तो बुधवारी रात्री कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचा अग्रीम दिला जाणार आहे. त्या साठीच्या सर्व अटी – शर्ती रद्द करण्यात आल्या आहेत. या ३०४ तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना ७ हजार ५०० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे.

दरम्यान, शासनाने पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नियोजनासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. कडबा, कडवळ, विविध प्रकारचा बुस्सा, भाताचे तनस आदी सुक्या चाऱ्यासाठी १२ रुपये तर मका, हात्ती गवत, ऊस आदी हिरव्या चाऱ्यासाठी प्रति किलो ८ रुपयांचा दर निश्चित केला आहे. या दराने गरजेनुसार चारा खरेदी केला जाणार आहे. या व्यतिरिक्त चारा वाहतुकीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अग्रीम मदत विना अट सर्वांना

पाच हजार रुपयांचा अग्रीम मदत विना अट सर्वांना वितरीत केली जाणार आहे. त्यामुळे प्राप्तीकर भरणारे शेतकरी, शासनाकडून वेतन घेणारे अधिकारी – कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना मदतीच्या यादीतून वगळण्याची प्रक्रिया करावी लागणार नाही. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त होताच शेतकरी ओळख क्रमाकांच्या मदतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रीम मदत जमा केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.