दुष्काळी भागात ‘वाचन संस्कृती’ला ‘मोहर’

दर दोन महिन्यांनी पुस्तक विक्रीचे हे प्रमाण तब्बल ३५-४० टक्क्यांनी वाढत आहे.

सहा महिन्यांत चार हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री; दर दोन महिन्यांनी विक्रीत ३५ टक्के वाढ

राज्यात दुष्काळी जिल्ह्य़ांत जमिनीला भेगा पडल्या असल्या तरी याच जमिनीत ‘वाचन संस्कृती’ मात्र बहरताना दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळात पिचून निघालेला असतानाही गेल्या सहा महिन्यांत पाच हजारहून अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे. यात वाचकांनी सर्वाधिक पसंती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, दलित साहित्य आणि शेतीविषयक साहित्यांवर नोंदवली आहे. विशेष म्हणजे दर दोन महिन्यांनी पुस्तक विक्रीचे हे प्रमाण तब्बल ३५-४० टक्क्यांनी वाढत आहे.

मराठवाडय़ातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, िहगोली तर  विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, आकोला, गोंदिया आणि गडचिरोली आदी जिल्हय़ांतील छोटय़ा-छोटय़ा खेडय़ांतून पुस्तकांची खरेदी केली जात आहे. यात औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नांदेड, वाशिम या जिल्ह्य़ांतून पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे.

यात दलित साहित्याचा उगम आणि विकास, दलित साहित्याची संकल्पना, सहित्याची वैचारिक पाश्र्वभूमी आणि दलित स्त्रियांची आत्मकथने या विषयांवर आधारित पुस्तकांना मागणी आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, त्यांची  निवडक भाषणे, त्यांचे मौलिक विचार, समाज आणि संस्कृतीचे त्यांनी केलेले विश्लेषण या विषयांवरील पुस्तकांना मागणी आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हय़ांतून गेल्या सहा महिन्यांत ४ हजार २९९ पुस्तकांची विक्री झाली आहे. या भागात दुकाने नसल्यामुळे बहुतांश लोक हे दूरध्वनीवरून पुस्तके मागवितात.

– मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा

विचार यात्रा’च्या माध्यमातून वाचकांना वैचारिक ग्रंथसंपदा पोहोचवल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून वाढती शैक्षणिक पात्रता वाचनाची प्रचंड भूक आणि माफक किमतीत उपलब्ध होणारी पुस्तके यामुळे मागणी वाढत आहे.

-राजन बावडेकर, प्रकाशक, लोकवाङ्मय गृह

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Drought area book selling increased

ताज्या बातम्या