विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरे जाताना सत्ताधारी गोटात अस्वस्थता असते, पण सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी बिनधास्त आणि विरोधी पक्षांमध्येच जुंपल्याचे चित्र बघायला मिळाले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे सकाळी विरोधात बोलतात आणि सायंकाळी साटेलोटे करतात, अशी तोफच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी डागली. यामुळे महायुतीमध्ये राज ठाकरे यांनी सामील व्हावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच ठाकरे यांनी तोंडघशी पाडले आहे.
आतापर्यंत प्रत्येक अधिवेशनापूर्वी होणाऱ्या विरोधी नेत्यांच्या बैठकांना मनसेचे नेते उपस्थित राहायचे. या वेळी मनसेचा कोणीही नेता उपस्थित नव्हता. याबद्दल खडसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, आपण गटनेते बाळा नांदगावकर यांना दूरध्वनी केला होता, पण ते का उपस्थित नाहीत हे माहीत नाही, असे सांगितले. मनसेने मात्र वेगळे अस्तित्व ठेवण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाचे समर्थन करताना विरोधी पक्षनेते खडसे यांनाच लक्ष्य केले. एकीकडे महायुतीमध्ये राज ठाकरे यांनी सहभागी व्हावे म्हणून भाजपचे किंवा ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे प्रयत्न सुरू असतानाच ठाकरे यांनी खडसे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचा आरोप करून महायुती आकारास येण्यापूर्वीच सारे काही ठिक नाही हेच संकेत दिले. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांच्यावर तोडबाजी करतात, असा जाहीरपणे आरोप केला होता. आता राज ठाकरे यांनी खडसे यांना लक्ष्य केले. राज ठाकरे यांच्या या पवित्र्यामुळे भाजपची मात्र चांगलीच गोची झाली आहे. खडसे हे प्रत्येक विषयांवर स्वत:च बोलतात. मनसेच्या आमदारांना बोलण्याची संधीच देत नव्हते, असेही राज ठाकरे म्हणाले.
तत्पूर्वी, विरोधी नेत्यांच्या बैठकीत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली. सरकार कोणत्याच मुद्दय़ावर गंभीर नसल्याचा आरोप करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांवर कांदिवलीतील जमीन वाटपावरून आलेल्या ताशेऱ्याचा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते खडसे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांचा खडसेंवर हल्ला
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे सकाळी विरोधात बोलतात आणि सायंकाळी साटेलोटे करतात, अशी तोफच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी डागली.  खडसे हे प्रत्येक विषयावर स्वत:च बोलतात. मनसेच्या आमदारांना बोलण्याची संधीच देत नव्हते, असेही राज ठाकरे म्हणाले.

खडसे यांनी आरोप फेटाळले
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेले सारे आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले. मुंबई किंवा पुण्यातील जमीन घोटाळ्याची अनेक प्रकरणे आपण गेल्या अडीच वर्षांत उपस्थित केली. नुसती उपस्थित केली नाही तर त्यावर सरकारला चौकशी करावी लागली. विविध घोटाळे बाहेर काढले तेव्हा मनसेचे आमदार गप्प बसून होते, असा टोलाही त्यांनी हाणला.