मुंबई: विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. राज्याचा सर्वंकष विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार पूर्ण करणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. .

मंत्रालय येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाने नागरिकांना अधिकारासोबतच कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी सर्व नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे भान ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच राहील, असा संकल्प करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला असून २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे. विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे, तर दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे होय असे प्रारंभीच स्पष्ट करीत फडणवीस यांनी महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून यंदाच्या पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के असल्याचे सांगितले. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास १३ जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास सरकरा कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळ पाहिला; मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातून राज्य कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देणारे पहिले राज्य

महिला शेतकरी कायदा तयार करून महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महिलांसह समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी लक्षित योजना राबवून सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना राज्यात आणले जात आहे. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासोबतच आधुनिक आणि ‘कटिंग-एज’ शिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.देशाच्या प्रगतीत आजही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि भविष्यातही देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ध्वजारोहणानंतर फडणवीस यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, सेनादलाचे अधिकारी, निमंत्रित नागरिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राजशिष्टाचार सचिव राजेश गवांदे, मंत्रालयीन विभागांचे प्रमुख, तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी, शासकीय अधिकारी -कर्मचारी आणि निमंत्रित नागरिक उपस्थित होते.