मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणाऱ्या दुष्काळ निधीप्रमाणे भूमिहीन शेतमजूर आणि अल्पउत्पन्न गटातील मजुरांनाही तातडीची दुष्काळ निवारण मदत आणि सामाजिक सुरक्षा लाभ देण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन त्यावर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

ग्रामीण कामगार संघटना स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या वतीने वकील देवयानी कुलकर्णी यांनी ही जनहित याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. त्यावेळी, ऊसतोडणी कामगारांच्या समस्यांशी संबंधित जनहित याचिका खुद्द न्यायालयानेच यापूर्वी दाखल करून घेतली आहे याकडे कुलकर्णी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली.

महाराष्ट्राच्या ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर कृषी संकटाकडे बुधवारी करण्यात आलेल्या जनहित याचिकेतून लक्ष वेधण्यात आले आहे. जमीन महसूल माफी आणि पीक कर्ज पुनर्रचना यांसारख्या मदत उपाययोजना जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदी आणि औपचारिक बँक कर्जांशी जोडलेल्या असल्याने भूमिहीन मजूर मदतीशिवाय वंचित राहिल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या शेतमजूर आणि कामगारांनाही तातडीने दुष्काळ निवारण उपाययोजना आणि सामाजिक सुरक्षा लागू करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणी याचिकेत केली आहे.