मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तसेच नागरी भागातील तातडीच्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांना आता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून देता येणार आहे. त्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात आमदारांना उपलब्ध असलेल्या निधीतून कामे मंजूर करण्याची तरतूद राज्य सरकारने केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार निधीचा वापर करता येणार आहे.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध प्रशासकीय विभागांकडून सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना पूरक म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे.

नव्या तरतुदीनुसार पाणीटंचाई असलेल्या ग्रामीण आणि नागरी क्षेत्रात शासनाच्या प्रशासकीय विभागांनी निश्चित केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रति काम कमाल २५ लाख रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, नवीन विंधन विहिरी व नळजोडणी, पाणीपुरवठा योजनांच्या पाइपलाइन आणि टाक्यांची विशेष दुरुस्ती, विहिरी खोल करणे किंवा गाळ काढणे, नवीन विहिरी अथवा साध्या विहिरी बांधणे आणि ट्यूबवेल घेणे यांचा समावेश आहे.

याशिवाय जुन्या विहिरींची विशेष दुरुस्ती, खोलीकरण किंवा पुनर्जीवन, पाणीपुरवठा योजनांसाठी वीजपंप बसविणे, नदीपात्रात बुडक्या घेणे तसेच तात्पुरती पाणीसाठवण व्यवस्था उभारणे किंवा आयएसआय प्रमाणित प्लास्टिक साठवण टाक्या बसविण्यालाही परवानगी देण्यात आली आहे.

दुष्काळाच्या काळात जनावरांसाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चारा छावण्यांमधील जनावरांना खाद्य देण्यासाठी बादल्या व टब पुरविणे, अधिकृत गोशाळांमध्ये शेड उभारणे आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक साहित्य पुरविणे या कामांचाही समावेश करण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक औषधे व साहित्य, तसेच शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर अथवा आरओ प्लांट बसविण्याची कामेही आमदार निधीतून करता येणार आहेत.

या निर्धारित कामांव्यतिरिक्त किंवा २५ लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्चाच्या कामांचा प्रस्ताव आमदारांनी सुचविल्यास, त्या कामाचे फायदे, शासनावर होणारा अतिरिक्त आर्थिक भार आणि अन्य बाबींचे सविस्तर विवेचन करून जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव ‘विशेष बाब’ म्हणून नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी सादर करावा, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.