मुंबई: राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना आखण्यासाठी सरकारने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे.
राज्यातील दुष्काळ, पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर सतत लक्ष ठेवून योग्य ते निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. या समितीच्या माध्यमातून टंचाईग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांना तातडीने मदत पुरवली जाणार आहे. या समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीला प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणे आणि दर आठवड्याला बैठक घेऊन दुष्काळाचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सादर करणे, शेतातील पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत शिफारसी करणे, प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा साठा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करणे, परिस्थितीनुसार तातडीने घ्यावयाच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत राज्य मंत्रिमंडळाला शिफारस करणे आदी जबाबदाऱ्या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.
