scorecardresearch

देयके मंजूर न केल्यास औषध पुरवठादारांचा आत्महत्येचा इशारा; हाफकिन औषध निर्माण महामंडळाला ४८ तासांची मुदत

हाफकिन औषध निर्माण महामंडळाल औषधपुरवठा करणाऱ्या वितरकांची मागील एक ते दोन वर्षांपासूनची देयके मंजूर करण्यात आली नाहीत.

देयके मंजूर न केल्यास औषध पुरवठादारांचा आत्महत्येचा इशारा; हाफकिन औषध निर्माण महामंडळाला ४८ तासांची मुदत
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो : (FE: file photo)

मुंबई : राज्यातील सर्व सार्वजनिक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांना औषधपुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन औषध निर्माण महामंडळाकडे आहे. मात्र महामंडळाच्या खरेदी कक्षातील अनागोंदी कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे, तर दुसरीकडे औषध पुरवठादारांची लाखो रुपयांची देयके प्रलंबित आहे. ही देयके वेळेवर मंजूर न झाल्याने औषध पुरवठादारांवर कर्जाचा बोजा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही देयके पुढील ४८ तासांत मंजूर न झाल्यास आत्महत्येचे पाऊल आम्हाला उचलावे लागेल, असा इशारा राज्यातील औषध वितरकांकडून हाफकिन औषध निर्माण महामंडळाला दिला आहे.

हाफकिन औषध निर्माण महामंडळाल औषधपुरवठा करणाऱ्या वितरकांची मागील एक ते दोन वर्षांपासूनची देयके मंजूर करण्यात आली नाहीत. काही वितरकांनी २०२० पासून, तर काहींची जुलै २०२२ पासून देयके प्रलंबित आहेत. ही देयके मंजूर करण्याबाबत हाफकिन औषध निर्माण महामंडळाकडे वारंवार विनंती व पाठपुरावा करूनही देयके अद्याप मंजूर करण्यात आली नाहीत. यातील अनेक पुरवठादार हे पूर्णपणे महाराष्ट्र राज्य पुरवठय़ावर अवलंबून आहेत. महामंडळाकडून देयके मंजूर न झाल्याने कच्चा माल देयके, मजुरांचे वेतन, बँकेचे व्याज किंवा हप्ते थकले आहेत. व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतलेल्यांचे हप्ते थकले असल्यामुळे आम्ही मानसिक, आर्थिकदृष्टय़ा अस्वस्थ झालो आहोत. येत्या काही दिवसांमध्ये देयके मंजूर न झाल्यास आमच्यासमोर आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा औषध वितरकांनी दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 02:04 IST