मुंबई : दुबईत राहून मुंबईसह देशभरात अमली पदार्थ तस्करीत सक्रिय असलेला सलीम डोला याने आपला दाऊदशी काहीही संबंध नसल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या चौकशीत केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. प्रसार माध्यमांनी आपला संबंध दाऊदशी जोडला. आपण स्वतंत्रपणे अमली पदार्थांची तस्करी करीत होतो. यातून मिळालेला पैसा अमली पदार्थ कारखान्यांसाठी भारतातच वापरला, अशी कबुली डोलाने गुन्हे अन्वेषण विभागाला चौकशीदरम्यान दिली आहे.
मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला असला तरी डोलाचा दावा मात्र अमान्य केला आहे. दाऊदच्या पाठिंब्याशिवाय डोला अमली पदार्थ तस्करीचे जाळे पसरवू शकत नाही, याबाबत तपास यंत्रणा ठाम आहेत. दाऊदचा शिक्का आपल्यावर बसू नये, यासाठी तो काळजी घेत असावा, असे यंत्रणेला वाटते. त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईलचा तपशील तपासला असता दाऊद टोळीतील कुणाच्याही तो संपर्कात नसल्याचे आढळून आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत डोलाच्या सांगलीतील मेफेड्रोनच्या कारखान्याची माहिती मिळाली होती. डोलाचा हस्तक प्रवीण ऊर्फ नागेश शिंदे याच्या चौकशीत डोलाचा मुलगा ताहिर आणि पुतण्या मुस्तफा कब्बावाला याची नावे पुढे आली. तपास यंत्रणेच्या विनंतीवरुनच या दोघांना भारतात पाठविण्यात आल्यानंतर त्यांच्या चौकशीत डोलाचा ठावठिकाणा शोधणे तपास यंत्रणांना कठीण गेले नाही. त्यातूनच डोला एप्रिलमध्ये भारताच्या ताब्यात आला. सांगली प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला तेव्हा झालेल्या चौकशीत डोलाने, आपला दाऊदशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आल्यामुळे त्याची आता लवकर सुटका होणे कठीण असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
थायलंडमध्ये मान्यता असलेल्या ‘फेंटानील’ या एक हजार कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांची तस्करी करीत असताना पकडला गेला होता. मात्र या प्रकरणात त्याच्याकडे सापडलेल्या फेंटानीलबाबत नकारात्मक अहवाल आल्यामुळे चार महिन्यांनंतर त्याची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर तो दुबईला पळून जाण्यात यशस्वी झाला. सलीम डोलाकडून मुंबई आणि देशाच्या इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन (एमडी) आणि कोकेनचा थेट पुरवठा होत होता, अशी माहिती मे २०२५ मध्ये चेन्नई तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलेल्या फैसल शेखने दिल्यानंतर डोलाविरुद्ध कारवाईला सुरुवात झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
डोला हा मूळचा सौराष्ट्र येथील मोरबीचा. कॉटन ग्रीन येथे राहत असताना गुटखा तस्करीत त्याचे पहिल्यांदा नाव आले. याच काळात तो काही का डोंगरीतही होता. त्यावेळी दाऊद टोळीशी त्याचा संबंध आला. त्यानंतर तो कुटुंबीयांसह मीरा रोड येथे राहावयास गेला असला तरी अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय होता. सध्या आफ्रिकेत असलेला उत्तर प्रदेशचा अमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत हा सिन्थेटिक ड्रग बनविण्यात माहिर होता. त्याच्या संपर्कात डोला होता. २०२५ मध्ये उत्तर प्रदेशमधील साजीद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण करुन त्याला महिनाभर डांबून ठेवण्याच्या प्रकरणात डोला सक्रिय होता. छोटा शकीलच्या आदेशावरुन त्याने हे घडवून आणले होते, असा गुन्हे अन्वेषण विभागाचा आरोप आहे.
